लोणी काळभोर : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने जिल्ह्यात पेट्रोल पंपांतील पेट्रोल आणि डिझेल चोरणार्या आंतरराज्य टोळीतील ३ जणांना जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. त्यांच्याकडून एका ट्रकसह चोरी करण्यासाठी वापरण्यात येेणारी हत्यारे असा एकण १६ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी श्रीराम लाला काळे (वय १९), दशरथ भिमा काळे (२१) व नाना गोविंद पवार (५६) तिघेही रा. तेरखेडा, जि. उस्मानाबाद ) यांना अटक करण्यात आली आहे. जिल्ह्यात पंपावरील पेट्रोल आणि डिझेल चोरीचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे अशा गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला विशेष पथक नेमून कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरे, सहाय्यक फौजदार दत्तात्रय गिरमकर, पोलीस हवालदार अनिल काळे, रविराज कोकरे, उमाकांत कुंजीर, काशीनाथ राजपुरे, विजय कांचन, अभिजित एकशिंगे, जनार्दन शेळके, राजू मोमिन व धिरज जाधव पथक तयार केले होते. या पथकाने इंधन चोरीबाबतच्या गुन्ह्यांची माहिती घेतल्यानंतर ट्रान्स्पोर्ट व्यवसायातील टोळी पेट्रोल, डिझेल चोरी करीत असल्याचे स्पष्ट झाले होते. शिवाय, सर्व संशयित वारंवार ट्रकमधून माल घेऊन पुणे बाजूकडे येत असल्याचेही स्पष्ट झाले होते. आज रोजी विशेष पथकाला संशयित हे तेरखेडा ( ता. वाशी जि. उस्मानाबाद ) येथील असल्याची माहिती त्यांना मिळाली होती.
त्यानुसार पथकाने तेरखेडा येथील फाट्यावरील एका पंपाची टेहळणी करताना ३ जण दिसून आले. संशय आल्याने ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यांनी पुणे जिल्ह्यातील पंपावरून पेट्रोल, डिझेल चोरी केल्याची कबुली दिली आहे. तसेच त्यांनी इंदापूर, वालचंदनगर, नातेपुते, अकलूज परिसरातील ५ ठिकाणी गुन्हे केले असल्याचे उघडकीस आले आहे. आहेत. या सर्व गुन्ह्यात मिळून एकूण १३ लाख ४० हजार रुपये किमतीचे १७ हजार ७१८ लिटर डिझेल चोरी केले आहे. यांतील दशरथ भिमा माने व त्याचे साथीदारावर रामदुर्ग, खानापूर, भेल गोल ( कर्नाटक ), शंखेश्वर, बार्शी, मिरज तासगाव, तसेच सांगली जिल्ह्यात डिझेल चोरी बाबतचे इतर ८ गुन्हे दाखल आहेत.