- नम्रता फडणीस- पुणे : भुतांचा वास, भुतांचा भास, भुतांच्या कथा, भुतांची भिती...यातल्या कशाचाच सामना आयुष्यात कधीच झाला नाही, असे सांगणारा मराठी माणूस दुर्मिळच. गावागणिक भुतांच्या कथा आणि भुतांनी झपाटलेल्या जागा असतातच. पडके वाडे, जुनीपुराण्या वडा-पिंपळाचे पार, अंधारे बोळ, बंदीस्त घरं अशा कुठल्याही निर्मनूष्य स्थळी भुतांची वस्ती असल्याचा समज असतो. या भुतांच्या भानगडीत सहसा कोणी पडत नाहीत. पुण्यातल्या तीन तरुणांनी मात्र हे धाडस केलं आहे.
ऐतिहासिक पुणे शहरात भुताखेतांची कमतरता नाहीच. या शहरातली अनेक भुते प्रसिद्ध (!) पावलेली आहेत. या भुतांनी पछाडलेल्या वस्तीस्थानी जाऊन भुतांचा मागोवा थेट व्हिडीओ कॅमेऱ्यात बंदीस्त करण्याचा प्रयत्न या तीन तरुणांनी चालवला आहे. पुण्याचा संकल्प माळवे, बंगालचा गौतम देबनाथ आणि गुजरातचा तहा राजकोटवाला हे तीन धाडसी तरुण आहेत. या तरुणांना भुतांनी का झपाटून टाकले आहे, हे ‘लोकमत’ने जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
रात्रीच काय पण दिवसादेखील ज्या ठिकाणी पाऊल टाकायला लोक घाबरतात, अशा दंतकथा बनून राहिलेल्या या ‘हॉंटेड प्लेसेस’चा शोध माळवे, देबनाथ आणि राजकोटवाला हे तिघेजण घेत आहेत. हे तिघेही उच्चशिक्षित असून खासगी कंपन्यांमध्ये नोकरीला आहेत. शनिवार आणि रविवारच्या रात्री हे तिघेजण भुतांनी पछाडलेल्या जागांचा माग काढायला निघतात. भुतांच्या जागांचे विविध कोनातून चित्रीकरण करतात. या चित्रीकरणावर आधारीत ‘युनिक पुणे’ नावाने ‘वेब सिरीज’च त्यांनी चालू केली आहे.
या वेब सिरीजचा पहिला भाग त्यांनी तळजाईवरच्या ढुमे बंगल्यावर चित्रीत केला. या धाडसी प्रयोगाबद्दल माळवने सांगितले, की आम्हाला काहीतरी वेगळे करायचे होते. तळजाईवरचा हा वाडा पडक्या अवस्थेत आहे. या वाड्यातल्या भुताटकीच्या बºयाच दंतकथा येथील जुनी मंडळी सांगतात. तशीच स्थिती रेसिडेन्सी क्लबच्या मागच्या बंगल्याची आहे. ज्याची फारशी कुणाला माहिती नाही अशाच जागा आम्ही पहिल्या टप्प्यात निवडल्या आहेत. यासाठी दिवसाही आम्ही तिथे जातो आणि रात्री बारा ते अडीचच्या दरम्यान पुन्हा त्या ठिकाणी जाउन चित्रीकरण करतो.
अर्थातच भुताटकीच्या जागांमध्ये पहिल्यांदा प्रवेश केल्यानंतरचा अनुभव थरारक असतो, असे माळवे म्हणाला. ‘‘भूत बंगल्यात गेल्यावर पहिल्यांदा अंगावर काटा उभा राहिला. भटक्या कुत्र्यांपासून सावधगिरी बाळगावी लागत होती. आम्ही खडकीच्या बंगल्यात शूटसाठी गेलो असता पहिल्या मजल्यावर मोठ्या प्रमाणावर झाडी उगवलेली दिसली. तिथून सळसळ आवाज आला. मनातून थोडे घाबरलोच. पण सरपटणारा साप गेल्याचे दिसताच जीवात जीव आला,’’ असा अनुभव त्याने सांगितला.
........भुतांची भिती घालवण्यासाठी‘‘लोकांच्या मनातील भीती दूर करणे हाच आमचा या सगळ््या उद्योगामागचा हेतू आहे. ‘झपाटलेल्या’ व ‘पछाडलेल्या’ जागांवरील अंधश्रद्धा दूर व्हावी व समाजप्रबोधन व्हावे हा आमच्या वेबसिरीजच्या निर्मितीचा उद्देश आहे. स्वार्थासाठी काही मंडळी लोकांच्या मनात जागांविषयीची भीती घालत असल्याचे आम्हाला दिसले,’’ असे भुतांच्या भानगडीत शिरलेल्या या तीन साहसी तरुणांनी सांगितले.
............भुतांनी पछाडलेल्या जागा तळजाई टेकडीवरचा ‘ढुमेंचा पडका वाडा’, जनरल वैद्य मार्गावरील रेसिडेन्सी क्लबच्या मागचा परिसर, कॅम्पातील ‘घोस्ट हाऊस’, इस्कॉन मंदिराजवळील ‘बंगला’ आणि खडकी परिसरातील ‘जुना बंगला’ ही ठिकाणे भुतांनी पछाडलेली असल्याची वदंता आहे. वानवडी बंगला, होळकर ब्रीज, शनिवारवाडा, पर्वती या स्थळांशी संबंधितही भुताखेतांच्या दंतकथा प्रचलित आहेत. या सर्व जागांवर मध्यरात्रीनंतर जाऊन चित्रिकरण केले जाणार आहे.----------------------------