पुणे : पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशाचे पाकीट चोरणाऱ्यास तीन महिने चार दिवस सक्तमजुरीची शिक्षा लोहमार्ग न्यायालयाने सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. एम. राऊत यांनी हा आदेश दिला.
महेश राजू राऊत (वय ३८, रा. झारीमुल, जि. पाडा, ओडिशा) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत धनंजय सिंग यांनी फिर्याद दिली आहे. धनंजय सिंग हे दि. ३ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता पुणे रेल्वे स्थानकावरील बुकिंग हॉलमध्ये पुणे-दानापूर एक्स्प्रेस गाडीची प्रतीक्षा करत होते. त्यावेळी आपल्या बॅगेतून राखाडी रंगाचे पाकीट चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी लोहमार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दिली. लोहमार्ग पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करत आरोपी राऊतला पकडून त्याच्याकडून चोरीला गेलेले पाकीट जप्त केले. सरकारी पक्षाच्या युक्तिवादानंतर लोहमार्ग न्यायालयाने शिक्षा सुनावली. करोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आरोपीला निकाल सांगण्यात आला. सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील वामन कोळी यांनी काम पाहिले. पोलीस निरीक्षक मौला सय्यद आणि रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक सी. आर. साबळे यांनी या गुन्ह्याचा तपास केला. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस नाईक के. बी. गुरव, हेड कॉन्स्टेबल बी. ओ. बमनाळीकर, पोलीस कॉन्स्टेबल जी. ए. शिंदे यांनी न्यायालयीन कामकाजात मदत केली.
---------------------------------