बाणेर : गणपती मंडळाच्या खजिनदाराकडे पोलिसांत दाखल असलेले मारहाणीचे गुन्हे मिटवण्यासाठी दहा हजारांची खंडणी मागून खूनाची धमकी देणा-या तिघांना सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. धनकवडीतील तीन हत्ती चौकात रविवारी पहाटे तीनच्या सुमारास हा प्रकार घडला.एका गणपती मंडळाच्या खजिनदाराने (वय ३५, रा. धनकवडी) याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून हर्षल राजेंद्र देशमुख (वय २०, रा. चव्हाणनगर, धनकवडी), आकाश विलास भिंताडे (वय २३, रा. यशवंतराव चव्हाण चाळ, धनकवडी) आणि प्रतीक रघुराम शेट्टी (वय २१, रा. शंकरमहाराज मठाजवळ, धनकवडी) या तिघांना अटक करण्यात आली आहे.तक्रारदार हे मंगळवार पहाटेपर्यंत विसर्जन मिरवणुकीची तयारी करत होते. त्यावेळी आरोपींनी त्यांच्याजवळ येऊन ‘माझ्यावर पोलीस केस आहेत, त्या मला मिटवायच्या आहेत,तू मला मंडळातील १० हजार रुपयेदे, नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी देऊन त्यांना अडवले.त्यानंतर रात्री नऊच्या सुमारास स्वत:च्या घरासमोर उभे असताना आरोपींनी त्यांच्याजवळ येऊन कोयत्याचा धाक दाखवून आरडाओरडा करून परिसरात दहशत निर्माण केली.त्यानंतर तक्रारदाराच्या अंगावर कोयता उगारून ‘तू पोलीस केस मिटवायला १० हजार देत नाहीस तर, मी तुला जिवंत सोडणार नाही’ असे म्हणून तक्रारदारासह त्यांच्या मित्रांना कोयत्याचा धाक दाखवला.तक्रारदार हे घाबरून घरात गेले आणि दरवाजा बंद करून घेतला. त्यावेळी आरोपींनी त्यांच्या घरावर कोयत्याने वार करून परिसरात दहशत निर्माण केली व खुनाची धमकी दिली. सहायक पोलीस निरीक्षक सी. एम. मोरे पुढील तपास करत आहेत.
खंडणी मागणा-या तिघांना अटक, सहकारनगर पोलिसांनी केली अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2017 2:24 AM