तळेगाव स्टेशन : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गहुंजे (ता. मावळ) हद्दीत एका प्रवाशास लुटणाऱ्या टोळीतील ३ जणांना तळेगाव पोलिसांनी अटक केली आहे, तर दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार विलास बोडके (वय १८), किशोर संपत बोडके (वय २२) व सनी साहेबराव गायकवाड (वय २०, सर्व रा. गहुंजे) यांना रविवारी अटक केली.फिर्यादी काकासाहेब मारुतराव विधाते (वय ५६, रा. खांदा कॉलनी, न्यू पनवेल; मूळ गाव फुलेवाडी, कोल्हापूर) हे १८ जुलै २०१४ रोजी मुंबईहून पुण्याकडे जात असताना त्यांची मोटार पंक्चर झाल्याने रस्त्याकडेला टायर बदलत असताना मोटारीच्या डिकीमध्ये ठेवलेली कपड्यांची बॅग एकाने चोरून नेताना फिर्यादीने पाहिले. फिर्यादीने आरडाओरडा केला. त्या वेळी आरोपीचे आणखी दोन साथीदार घटनास्थळी आले. त्यांनी फिर्यादी व त्याच्या चालकास शिवीगाळ करून दमदाटी केली आणि लोखंडी रॉडचा धाक दाखवून फिर्यादीची कपड्याची बॅग व रोख ३५०० रुपये आणि चालकाकडील ६००० रुपये जबरदस्तीने चोरून पसार झाले.गहुंजे हद्दीत (मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर) असे लूटमारीचे प्रकार अनेकदा घडले आहेत. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला. त्याद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, ओंकार बोडके, किशोर बोडके, सनी गायकवाड, अभिजीत सुरवसे या आरोपींना अटक करण्यात आली आहे. लूटमार करणाऱ्या टोळीकडून यापूर्वी घडलेल्या अनेक गुन्ह्यांचाही तपास लागेल, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करण्यात येत आहे. (वार्ताहर)
लूटमारप्रकरणी तीन जणांना अटक
By admin | Published: July 29, 2014 3:18 AM