पुणे (वाघोली) : कच्च्या रस्त्यालगत असणाऱ्या विहिरीत फोर व्हीलर पडून त्याच्यातील ३५ वर्षीय महिला व त्यांच्या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अष्टापुर (ता.हवेली) येथे मंगळवारी (दि.९) रात्री साडे दहाच्या सुमारास घडली. या अपघातात महिलेचे पती बचावले आहेत. तिघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले असून त्यांच्यावर बुधवारी सकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. शितल सचिन कोतवाल (वय ३५) यांच्यासह मुलगी सृष्टी (वय ९) व शौय (वय ६) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर सचिन श्रीहरी कोतवाल बचावले आहेत. याबाबतीत मिळालेल्या माहितीनुसार, सचिन कोतवाल हे त्यांची पत्नी व दोन मुलांसह राहू (ता.दौंड) येथे सासुरवाडीला गेले होते. तेथून परतत असताना अष्टापूर येथील रामकृष्ण मंगल कार्यालयाजवळ एका शॉर्टकट रस्त्याच्या वळणावरील विहिरीत त्यांची फोर व्हिलर कोसळली. सचिन कोतवाल यांनी गाडीतून पत्नी व दोन मुलांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र गाडीच्या काचा बंद असल्याने तो प्रय त्न अयशस्वी ठरला. विहिरीला संरक्षक कठडे नसल्याने फोर व्हिलर विहिरीत पडून तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने हवेली महसूल विभागाने याची गंभीर दखल घेतली आहे. हवेलीत सर्व विहिरींचे सर्व्हेक्षण करून संबंधित विहीर मालकांना संरक्षक कठडे उभारण्याबाबत सूचना देण्यात येणार आहे.
फोर व्हिलर विहिरीत पडून दोन चिमुरड्यांसह आईचा दुर्दैवी मृत्यू ; हवेली तालुक्यातील अष्टापूरची घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 11:51 AM