बाभूळगाव : बाभूळगाव (ता. इंदापूर) येथे शेतजमीन मोजणीच्या वादातून मागासवर्गीय (चर्मकार) कुटुंबाला त्याच गावातील पाच जणांनी जबर मारहाण करून गंभीर जखमी केल्याबाबतची फिर्याद नितीन दगडू लोंढे (वय ४०, रा. बाभूळगाव, ता. इंदापूर, जि. पुणे) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात दिली आहे. तर गंभीर मारहाण करून दहशत निर्माण करणा-या पाचपैकी तीन जणांवर अनुसूचित जाती आणि जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून इतर दोन जणांवर जबर मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती इंदापूर पोलिसांनी दिली आहे. पांडुरंग भगवान देवकर, अजित पांडुरंग देवकर, नवनाथ पांडुरंग देवकर (सर्व बाभूळगाव, ता. इंदापूर, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून सचिद्र्या वाफ्या पवार व अक्षय सचिद्र्या पवार यांचेवर जबर मारहाण करून फिर्यादी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना गंभीर जखमी केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. जमिनीची शासकीय मोजणी करण्यासाठी इंदापूर भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी बाभूळगाव येथे जमीन मोजणी करत असताना वरील घटना घडली आहे. जमीन मोजणी अधिकारी यांनी मोजणी करून शेतीची हद्द व खुणा पूर्ण केल्या. त्यावेळी वरील आरोपी यांनी संगनमत करून मोजणीच्या ठिकाणी आले व फिर्यादींना दमदाटी करून डोक्यात दगड फेकून मारला व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी फिर्यादीचे वडील वरील सर्वांना मारहाण करू नका, असे सांगत असताना फिर्यादीचे वडील यांच्या हातावर लोखंडी गजाने मारहाण केली. बाभूळगाव येथे मारहाणीत गंभीर जखमी नितीन लोंढे, इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल.
बाभूळगावमध्ये तीन जणावर अॅट्राॅसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2021 4:09 AM