सांगवी : बारामती तालुक्यातील माळेगाव येथे चंदनाच्या लाकडांची अवैधरित्या विक्री करणाऱ्या आरोपींवर माळेगाव पोलिसांनी कारवाई केली आहे. यामध्ये १७ हजार रुपये किंमतीचे चंदन जप्त करण्यात आले. पुढील कारवाईसाठी आरोपींना वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
माळेगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल घुगे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. सचिन दीक्षित भोसले (वय २८) ,ऋषिकेश सुदाम पवार (वय १९),राजेंद्र लक्ष्मण कुचेकर (वय २५),तिघे रा.माळेगाव ता. बारामती जि. पुणे अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
सचिन भोसले हा माळेगाव खुर्द येथील पाण्याच्या टाकी जवळ चंदनाची लाकडे विक्रीसाठी चंदन घेऊन थांबला असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक घुगे यांना मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलिस हवाल दार शाशिकांत वाघ, दत्तात्रेय चांदणे, प्रशांत राऊत, दीपक दराडे यांनी सापळा रचत तिघांना शिताफीने ताब्यात घेतले.
आरोपींना ताब्यात घेतले असता ४८ किलो ४०० ग्रॅम असे अंदाजे एकूण १७ हजार रुपये किंमतीचे कच्चे चंदन मिळून आले. पुढील कारवाईसाठी वन परीक्षेत्र अधिकारी बारामती वन विभाग यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कामगीरी बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक राहुल घुगे,पोलीस हवालदार शाशिकांत वाघ,पोलीस नाईक दत्तात्रेय चांदणे, प्रशांत राऊत,दीपक दराडे यांनी केली आहे.