पुणे : शहरातील वाहतूक शाखेचे लाच प्रकरणात कारवाई झालेले पोलीस उपनिरीक्षक बसवराज चिट्टे, डॉक्टरांना मारहाण करणारा गुन्हे शाखेचा पोलीस कर्मचारी सचिन गायकवाड आणि अवैध धंदेवाल्यासोबत संबंध असल्याचे निष्पन्न झालेला विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातील कर्मचारी सोमनाथ बाळु खळसोडे यांना निलंबित करण्यात आले आहे.
जाहिरात फलकासाठी एनओसी देण्यासाठी साडेतीन लाख रूपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून चिट्टे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांची नेमणूक आणि ते ज्या ठिकाणी काम करत होते. त्यावरून देखील विविध चर्चांना उधाण आले होते. याप्रकरणी चिट्टे याना निलंबित करण्याचे आदेश पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी काढले आहेत. तसेच त्यांची खात्यातंर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे.
बाणेर येथील कोविड सेंटरमधील डॉक्टरांना मारहाण करणार्या प्रकरणात सचिन गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांनी गायकवाड याला निलंबित केले आहे.
विश्रांतवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस शिपाई सोमनाथ खळसोडे यांनी पदाचे गैरवापर करत अवैध धंदेवाल्यांशी संबंध ठेवल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित केले आहे. परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांनी निलंबनाचे आदेश काढले आहेत.