पुणे : वारजे पोलीस ठाण्यातील तपास पथकाच्या कार्यालयातून अटक केलेला आरोपी पळून गेल्याप्रकरणी पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी वारजे पोलीस ठाण्यातील तिघा कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.
पोलीस हवालदार संभाजी गायकवाड, पोलीस नाईक महेश धोत्रे आणि पोलीस शिपाई विशाल कदम अशी निलंबित केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
वारजे येथील एका ४ वर्षांच्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून एका २८ वर्षांच्या नराधमाला पोलिसांनी १७ सप्टेंबरला सायंकाळी अटक केली होती. त्यानंतर त्याला या तिघांच्या देखरेखीखाली तपास पथकात ठेवण्यात आले होते. मध्यरात्रीनंतर सर्व जण झोपल्यावर आरोपी १८ सप्टेंबर रोजी पळून गेला. हा प्रकार सकाळी ६ वाजता पोलिसांच्या लक्षात आला. त्यानंतर एकच गडबड उडाली होती. बरीच शोधाशोध केल्यानंतर हा आरोपी एका दारूच्या गुत्त्यावर आढळून आला होता. मात्र, पोलिसांनी कर्तव्यात निष्काळजीपणा केल्यामुळे पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी त्याची दखल घेऊन तिघांना निलंबित केले आहे.