पुणे : ससून रुग्णालयात उपचार घेतलेल्या हिंदु राष्ट्रसेनेचा पदाधिकारी तुषार हंबीर याच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यावेळी बंदोबस्तावर नेमणूक केलेल्या चौघांपैकी तिघे चक्क जागेवरच नव्हते. या अनुपस्थित तिघा पोलीस कर्मचार्यांना पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी निलंबित केले आहे.
पोलीस नाईक पांडुरंग भगवान कदम, पोलीस शिपाई राहुल नंदु माळी आणि सिताराम अहिलु कोकाटे अशी निलंबित केलेल्या पोलीस कर्मचार्यांची नावे आहेत. हे सर्व जण पोलीस मुख्यालयातील कोर्ट कंपनीमध्ये नेमणुकीला होते.
मोक्का कायद्यांतर्गत येरवडा कारागृहात तुषार हंबीर असताना त्याच्यावर उपचार करण्यासाठी ससून रुग्णालयातील इन्फोसिस जनरल वॉर्डमध्ये २५ ऑगस्ट रोजी दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरु असताना कोर्ट कंपनीतील चौघांची बंदोबस्तावर नेमणूक करण्यात आली होती.
५ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ ते पावणे दहा वाजण्याच्या दरम्यान चौघांनी वॉर्डमध्ये शिरुन हंबीर याच्यावर गोळी झाडली. परंतु ती उडली नाही. तेव्हा त्यांनी कोयता, तलवारीने हंबीरवर हल्ला केला. तेव्हा बंदोबस्तावर नेमलेल्या चौघांपैकी केवळ एक पोलीस कर्मचारी होता. त्याने हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यात ते जखमी झाले होते. मात्र, त्यावेळी ड्युटीवर नेमणूक असतानाही तिघे जण घटनास्थळी अनुपस्थित असल्याचे दिसून आले. त्यामुळे तिघाही पोलीस कर्मचार्यांना पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी निलंबित केले आहे.