पुण्यामधील एका खाजगी रुग्णालयात ५१ वर्षीय महिलेला दाखल करण्यात आले. तिला झटके येत होते. मात्र उपचारापूर्वीच तिचा मेंदू मृत झाला होता. या संदर्भात समन्वयकाची भूमिका पार पाडणाऱ्या रोहिणी सहस्त्रबुद्धे यांनी मुलाचे आणि नातेवाईकांचे अवयवदानासंदर्भात समुपदेशन केले. त्यांनी बुधवारी (१८ आॅगस्ट) सहमती दर्शवली. सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून या महिलेची दोन फुप्फुसे, यकृत आणि दोन मूत्रपिंडे दान करण्यात आले. फुप्फुस प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पुण्यात होत नसल्याने चेन्नई येथे पाठवण्यात आले. तेथील रुग्णालयाने स्पेशल चार्टर प्लेनने ते फुप्फुस चेन्नईला नेले. यकृत पुण्यातील बिर्ला रुग्णालयात तर दोन्ही मूत्रपिंडे रुबी हॉल रुग्णालयात प्रत्यारोपणासाठी नेण्यात आल्या.
स्वादुपिंड आणि हृदय प्रत्यारोपणास योग्य नसल्याचे तपासाअंती लक्षात आल्याने त्याचे दान होऊ शकले नाही. याविषयात या महिलेच्या कुटुंबीयांना अवयवदानाविषयी संक्षिप्त माहिती होती, त्यामुळे त्यांनी अवयवदान करण्याची चर्चेअंती तयारी दर्शवल्याचे सहस्त्रबुद्धे म्हणाल्या.