उरुळी कांचन : येथील परिसरामध्ये १५ दिवसांत ३ जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला असून, यामुळे साथींच्या रोगाने थैमान घातले आहे. आरोग्य खाते निष्क्रिय असून ग्रामपंचायत प्रशासनदेखील बघ्याची भूमिका घेत आहे. डुकरांचा बंदोबस्त करण्यास प्रशासन असमर्थ ठरल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. उरुळी कांचनच्या सरपंचावर अविश्वास ठराव मंजूर झाल्याने व उपसरपंचांनी राजीनामा दिल्याने प्रशासनावर कोणाचा धाक राहिलेला नाही.माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य सुनील कांचन म्हणाले, उरुळी कांचन परिसरात पाचशेहून अधिक डेंगीसदृश तापाचे रुग्ण उपचार घेत आहेत. गावाला सध्या सरपंच व उपसरपंच नसल्याने प्रशासन ढिले पडले आहे. जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग केवळ कागदोपत्री सर्वेक्षण करून, नागरिकांची व जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची दिशाभूल करीत आहे.विशेष म्हणजे आठ-दहा दिवसांपूर्वी कोणा बाहेरच्या व्यक्तीने टेम्पो भरून डुकरे आणून ती उरुळी कांचनच्या ओढ्याजवळ सोडली, ही बाब काही ग्रामपंचायत कर्मचाºयांना दिसत असतानादेखील त्यांनी त्यास अटकाव करण्यात आला नसल्याचे नागरिकांनी सांगितले. ही बाब ग्रामविकास अधिकारी के. जी. कोळी यांचे निदर्शनास आणल्यावर त्यांनीही हतबलता दर्शविली.शिंदवणे गावातील काळे शिवार भागातील प्रभावती वाल्मीक क ांचन यांचे बारा दिवसांपूर्वी स्वाइन फ्लूमळे झालेल्या मृत्यूचे दु:ख अद्याप ताजे असतानाच, प्रभावती यांचे पती वाल्मीक जयवंत कांचन यांचाही मंगळवारी (दि. २५) सकाळी स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला. केवळ तेरा दिवसांच्या आत पती-पत्नीचा मृत्यू स्वाइन फ्लूमुळे झाल्याने कांचन कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.अस्वच्छता, वातावरणात होणारे अचानक बदल आणि साथीच्या रोगांना अटकाव करण्यास ग्रामपंचायतीसह जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेला अपयश आलेले आहे. केवळ उरुळी कांचन गावातील खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या साथीच्या रुग्णांची संख्या ५00 पेक्षा अधिक झाली आहे. एकीकडे स्वाइन फ्लूची भीती तर दुसरीकडे डेंग्यूचा धोका अशा दुहेरी कचाट्यात ग्रामस्थ सापडले आहेत.स्वाइन फ्लूबाबत घेतली जाणार दक्षताबारामती : स्वाइन फ्लूसदृश वाढत्या आजाराबाबत प्रशासकीय पातळीवरून दक्षता घेण्यात येणार आहे. याबाबत बारामती उपजिल्हा रुग्णालय व बारामती पंचायत समिती येथे आरोग्य विभागातील कर्मचारी व अधिकाºयांची कार्यशाळा पार पडली.स्वाइन फ्लू, डेंग्यू, चिकुनगुनिया आजारासंबंधी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक करावयाच्या उपाययोजना करण्याबाबत या कार्यशाळेत सूचना करण्यात आल्या. या कार्यशाळेस वैद्यकीय अधीक्षक डॉ. मीरा चिंचोलीकर, डॉ. महेश जगताप, विस्तार अधिकारी सुनील जगताप व आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यशाळेत डॉ. चिंचोलीकर यांनी स्वाइन फ्लूची लक्षणे, औषधोपचार व उपजिल्हा रुग्णालयात स्थापन केलेल्या स्वाइन फ्लू कक्षाबाबत सविस्तर असे मार्गदर्शन केले.तसेच तालुका व शहरातील संशयित स्वाइन फ्लू रुग्णाच्या घशातील स्रावाची तपासणी, औषधोपचाराबाबत टॅमी फ्लू गोळ्यांचा पुरवठा, तसेच स्वाइन फ्लू झालेल्या रुग्णांवर उपचार करण्याची कार्यवाही स्वाइन फ्लू कक्ष, उपजिल्हा रुग्णालय, बारामती येथे करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी डॉ. महेश जगताप यांनी स्वाइन फ्लू, डेंग्यू, चिकुनगुनिया प्रतिबंधात्मक व उपचारात्मक उपाययोजनाबाबत झालेली कार्यवाही व करावयाच्या उपाययोजनांबाबत विवेचन केले. विस्तार अधिकारी सुनील जगताप यांनी लक्षणे, उपाययोजना, धूरफवारणी, कोरडा दिवस याबाबत मार्गदर्शन केले. एस. एम. पाटील यांनी आभार मानले.मी जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. दिलीप माने यांच्याशी बोललो आहे. त्यांना सूचना दिल्या आहेत. पण डॉ. माने यांनी नेमकी काय उपाययोजना केली, याची काहीच कल्पना रुग्ण वा त्यांच्या नातेवाईकांना सध्या तरी उरुळी कांचनच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध नाही.-डॉ. संजय देशमुख, उपसंचालक,आरोग्य सेवा मंडळ
उरुळी कांचनला तिघांचा स्वाइन फ्लूने बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 1:47 AM