पुणे : तडीपारीचा भंग करून वडगाव शेरी परिसरात वास्तव्य करीत असलेल्या ३ तडीपार गुंडांना गुन्हे शाखेच्या युनिट ४ ने अटक केली़
सीमा रमेश हातांगळे (वय ३५), प्रशांत रमेश हातांगळे (वय १९), आणि दिनेश चंद्रशेखर नायडू (वय ३४, रा़ चंदननगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़
पुणे, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि पुणे जिल्ह्यातून या तीनही आरोपींना फेब्रुवारी महिन्यात २ वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे़ तडीपार आरोपी अस्तित्व लपवून चंदननगर परिसरात राहत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार सुरेंद्र साबळे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट चारचे पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे यांच्या पथकाने तीनही आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांच्याकडे शहरात येण्यासाठी परवानगी नसल्याचे उघडकीस आले. त्यानंतर तिघांना अटक करण्यात आली. ही कामगिरी सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे, सहायक पोलीस निरीक्षक संदीप जमदाडे, सहायक पोलीस निरीक्षक शोभा क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील, सुरेंद्र साबळे, नागेश कुंवर, शीतल शिंदे, दत्ता फुलसुंदर, कौस्तुभ जाधव, स्वप्निल कांबळे, सोनम नेवसे, भाग्यश्री वाघमारे यांच्या पथकाने केली आहे.