पुणे : स्वारगेट भागातील एका सोसायटीच्या आवारात शिरून चंदनाचे झाड कापून नेणाऱ्या चोरट्यांना गस्त घालणाऱ्या पोलिसांनी मध्यरात्री पकडले. याप्रकरणी सुनिल नामदेव जमदाडे (वय ३४), दिलीप दत्तू पवार (वय ६०, दोघे रा. लक्ष्मीनगर, येरवडा) आणि कैलास प्रकाश चव्हाण (वय ३०,रा. ता. वाळवा, जि. सांगली) यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी पोलीस शिपाई सुहास चिरमे यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शंकरशेठ रस्त्यावरील न्यू प्रसन्ना सोसायटीच्या आवारात मध्यरात्री जमदाडे, पवार, चव्हाण शिरले. त्यांनी करवतीच्या सहाय्याने आवारातील चंदनाचे झाडाचा बुंधा कापला. त्यावेळी रात्रपाळीत गस्त घालणाऱ्या पोलिसांनी जमदाडे, पवार, चव्हाण यांच्या संशयास्पद हालचाली पाहिल्या. पोलिसांना पाहताच तिघे जण तेथून पसार होण्याच्या तयारीत होते. पोलिसांनी तिघांना पकडले. त्यांच्याकडून चंदनाच्या झाडाचा बुंधा जप्त करण्यात आला. पोलीस हवालदार शेख तपास करत आहेत. दुसऱ्या घटनेत एनडीए रस्त्यावर असलेल्या एका बंगल्यात शिरून चोरट्यांनी चंदनाच्या झाडाचा बुंधा कापून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हनुमंत मोरे (वय ५५, रा. कोपरे गाव, उत्तमनगर) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक ए. ए. दुगावकर तपास करत आहेत.
स्वारगेट येथे चंदनाचे झाड चोरणाऱ्या तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 6:59 PM