चाकण : अवकाळी पावसाचा फटका आणि लॉकडॉऊन होण्याच्या भीतीने शेतकऱ्यांनी येथील महात्मा फुले उपबाजारात मोठ्या प्रमाणावर कांदा विक्रीसाठी आणला होता. बुधवारी (दि. ५) तब्बल तीन हजार २०० पिशव्यांची म्हणजे १ हजार ६०० क्विंटलची आवक झाली. वाढत्या आवकमुळे कांद्याला ८ ते १० रुपये असा प्रतिकिलो बाजारभाव मिळाला.
चाकण बाजारात उन्हाळी गरवा कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत असते. अवकाळी पावसामुळे आणि कोरोनाच्या प्रकोपाने बळीराजा मेटाकुटीला आला आहे. मागील दोन महिन्यांपासून कांद्याचे भाव कोसळत आहेत. उत्पादन खर्चही वसूल होत नाही. दोन महिन्यांपूर्वी कांद्याला घाऊक बाजारात ४० रुपये प्रतिकिलो भाव मिळत होता. सध्या तो भाव अगदी ८ ते १० रुपये प्रतिकिलोपर्यंत खाली आला आहे.
गेल्या दोन वर्षांतील हा सर्वात नीच्चांकी भाव कांद्याला मिळतो आहे. यावर्षी मुबलक प्रमाणात पाणी असल्याने शेतकऱ्यांनी उन्हाळी कांद्याचे उत्पादन मोठे घेतले आहे. बहुतांश शेतकऱ्यांकडे कांदा साठवण्यासाठी कांदाचाळ नसल्याने त्यांना आपला कांदा मिळेल त्या बाजारभावात विक्री करावा लागत आहे. मागील वर्षांपासून शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची गरज आहे, असे बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
०५ चाकण बाजार
( संग्रहित फोटो )