पुणे : गुणपत्रिका देण्यासाठी विद्यार्थ्याकडून पैसे घेतल्याचा प्रकार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील परीक्षा विभागात शनिवारी दि. २६ राेजी उघडकीस आला हाेता. याप्रकरणी परीक्षा विभागातील वरिष्ठ सहायकपदी कार्यरत असलेले डाॅ. संजय संपतराव नेवसे या कर्मचाऱ्यास निलंबित करण्याचे आदेश कुलसचिव डाॅ. प्रफुल्ल पवार यांनी दिले.
प्रथम भंडारी हा बीए तृतीय वर्षाची गुणपत्रिका घेण्यासाठी शुक्रवार दि. २५ राेजी परीक्षा विभागात गेला हाेता. तेव्हा वरिष्ठ सहायक संजय नेवसे यांनी त्याच्याकडे चार हजार रूपयांची मागणी केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दि. २६ राेजी प्रथम हा त्याच्या वडिलांसह परीक्षा विभागात गेला तेव्हा नेवसे याने तीन हजार रूपये घेत गुणपत्रिका दिली. याप्रकाराबाबत माहिती समजताच अभाविपच्या कार्यकर्त्यांनी नेवसेला रंगेहाथ पकडून त्यांचा भांडाफाेड केला. तेव्हा ‘ मी पैसे मागितले नाही, या विद्यार्थ्यांनेच मला दिले’ अशी कबुली देत खिशातून घेतलेले पैसे काढून दिले हाेते तसेच याप्रकाराची चित्रफित समाजमाध्यमावर प्रसारित झाल्याने एकच खळबळ उडाली हाेती.
दरम्यान, नेवसे याने कामात सचाेटी न राखता स्वत:च्या अर्थिक फायद्यासाठी गैरव्यवहार केला आहे. त्याचे हे वर्तन विद्यापीठ सेवकास अशाेभनीय आहे असे सांगत दि. २९ ऑगस्ट पासून निलंबित करण्यात येत असल्याचे डाॅ. पवार यांनी दिलेल्या आदेशात नमूद आहे.