पुणे: मध्यप्रदेश विधानसभेचे आमदार, मंत्री असल्याची बतावणी करत टोळक्याने बनावट नोटा बनविण्याचा डेमो दाखवून एका मार्बल व्यावसायिकाला ३० लाख रुपयांच्या नोटा देण्याचे प्रलोभन दाखवत ५ लाख ३४ हजारांना गंडा घातला. व्यावसायिकाने पैसे परत मागितल्यावर त्यांनी पिस्तूलाच्या धाकाने जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अधिकचे पैसे घेण्यासाठी ते आले असताना पोलिसांनी सापळा रचून त्यांच्यातील तिघांना पकडले.
याप्रकरणी खराडी येथील व्यावसायिकाने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रुपाली राऊत, संजयकुमार पांडे, विकासकुमार रावत, समीर उर्फ विशाल घोगरे (रा. निलंगा लातूर), अशोक पाटील (रा.कोल्हापूर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना वानवडी येथील एसआरपीएफ जवळ ३० मार्च ते २० एप्रिल दरम्यान घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मार्बलचा व्यवसाय आहे. खराडी बायपास येथे २६ मार्च रोजी चहा पित असताना, त्यांची रुपाली हिच्यासोबत ओळख झाली होती. त्यावेळी तिने आपली आमदार, खासदारांसोबत ओळख असल्याचे सांगून तिप्पट पैसे मिळवून देण्याबाबत योजना असल्याचे सांगितले. तिने आरोपी पांडे हा मध्य प्रदेश सरकारमध्ये मंत्री असून त्याच्यासोबत फिर्यादीचे बोलणे करून दिले. त्याने पाच लाख रुपये दिले तर 30 लाख रुपये परत मिळतील असे सांगितले. फिर्यादी ही प्रलोभनाला बळी पडले. ३० मार्च रोजी ते एसआरपीएफ ग्रुप परमारनगर येथे भेटले. पांडे हा आपल्या साथीदारासोबत तेथे आला होता. फिर्यादींना आरोपींनी आपल्या जाळ्यात खेचण्यासाठी बनावट नोटा कशा असतात व त्या केमिकलद्वारे कशा तयार केल्या जातात, हे प्रात्यक्षिक दाखविले. त्यांना खर्याच ५ -६ नोटा बनावट नोटा बनविल्याचे सांगून दिल्या. त्यांनी त्या वटविल्याने त्यांच्या विश्वास बसला. त्यानंतर पिस्तूलाचा धाक दाखवून हे कोणाला सांगितले तर ठार मारू अशी धमकी दिली. फिर्यादीने दिलेले आश्वासन व धमकीमुळे सुरुवातीला चार लाख रुपये त्यांच्या हवाली केले. त्यानंतर देखील त्यांच्याकडून वेळोवेळी असे एकूण ५ लाख ३४ हजार रुपये घेतले. पैसे दिल्यानंतर देखील तिप्पट पैसे मिळत नाहीत हे लक्षात आल्यानंतर फिर्यादींनी पांडे, रुपाली यांच्यासोबत संपर्क केला. मात्र त्यांनी संपर्क बंद केला. तसेच वारंवार त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. दरम्यान अपहार व आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादींनी पोलिसांकडे धाव घेतली.
असा रचला सापळा
साडे पाच लाख दिल्यानंतर ते आणखी पैसे दिले तर ३० लाख रुपयांच्या नोटा देऊ असे त्यांनी सांगितले. त्यानुसार, फिर्यादी पैसे घेऊन नाशिक फाटा येथे गेले. फिर्यादीकडून पैसे येण्यासाठी आलेल्या दोघांना साध्या वेशातील पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांच्यातील एक जण तळेगाव येथे असल्याचे समजल्यावर त्याला पकडण्यात आले.
असे ओढायचे जाळ्यात
बनावट नोटांची ही टोळी तीन टप्प्यात काम करायची. प्रथम काही जण सावज हेरुन आमिष दाखवत. त्यांच्या जाळ्यात तो आल्याचे दिसताच मंत्री, आमदार असल्याचे सांगून डेमो दाखवायचे. त्यानंतर तिसरा ग्रुप संबंधितांकडून पैसे घेऊन जायचा. यामध्ये सध्या पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्यात आणखी काही जणांचा सहभाग आहे. त्यांनी आतापर्यंत किती जणांना गंडा घातला. त्यांना बनावट नोटा दिल्या का.याचा तपास करण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक संतोष सोनवणे तपास करीत आहेत.