पुणे : हडपसर भागातील लाॅजमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दाफाश केला. पथकाने बुधवारी लाॅजवर छापा टाकत एका आराेपीस ताब्यात घेतले. तीन पीडित युवतींची सुटका केली.
हडपसर भागातील एका लाॅजवर मुलींकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागास मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेचे पाेलिस उपायुक्त अमाेल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक विजय कुंभार, सहायक निरीक्षक अनिकेत पाेटे, अंमलदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, मनीषा पुकाळे, अण्णा माने, पुष्पेंद्र चव्हाण, अमित जमदाडे यांच्या पथकाने लक्ष्मी काॅलनीतील एस. के. रेसिडेन्सी लाॅजवर छापा टाकला. तेथून एका आराेपीस ताब्यात घेत तीन पीडित युवतींची सुटका करण्यात आली. दाेघा आराेपींविराेधात हडपसर ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पथकाने दुसऱ्या एका कारवाईत हडपसर परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर कारवाई केली आणि १४ जणांना ताब्यात घेतले. घटनास्थळावरून जुगाराचे साहित्य, राेख रक्कम, माेबाईल आदी चाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.