याप्रकरणी रोहित विजय अवचरे (वय २४, रा. लक्ष्मीनगर, शाहू वसाहत, पर्वती, पुणे) व आदित्य सोपान साठे (वय २६, रा. जनता वसाहत, पर्वती पायथा, पुणे) या दोघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, अवचरे हा तडीपार गुंड असून जिल्ह्यातून त्याला तडीपार करण्यात आले आहे. मात्र, तरीही तो जिल्ह्यात दिसून आला.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला खबऱ्याकडून रोहित अवचरे आणि आदित्य साठे या दोघांकडे गावठी पिस्तूल असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी कोंढाणपूर फाटा येथे सापळा लावला होता. त्यावेळी अवचरे आणि साठे एका दुचाकीवरून तेथे आले असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता, दोन्ही सराइतांच्या कमरेला प्रत्येकी एक गावठी बनावटीचे पिस्तूल मिळून आले. तसेच त्यांचेकडील गाडीची डिकी तपासली असता त्यामध्ये एक गावठी पिस्तूल अशी एकूण ३ गावठी पिस्तूल आणि २ जिवंत काडतुसे मिळून आली. या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरे, रामेश्वर धोंडगे, सहायक फौजदार दत्तात्रय जगताप, पोलीस हवालदार राजू मोमीन, चंद्रकांत जाधव, अमोल शेडगे, मंगेश भगत, धीरज जाधव, अक्षय नवले, पूनम गुंड, मुकुंद कदम यांच्या पथकाने केली.
२१ लोणी काळभोर
अटक केलेल्या सराइतांसमवेत पोलीस पथक.