लोणी काळभोर : दुकानदाराने दाखवलेल्या समयसूचकतेमुळे विविध दुकानांतून कपडे चोरी करणाऱ्या तीन परप्रांतीय महिलांसह एक पुरुष अशा चार जणांच्या टोळीस लोणी काळभोर पोलिसांनी जेरबंद केले आहे. ते चोरी करण्यासाठी वापरत असलेली रिक्षा जप्त करण्यात आली आहे.याप्रकरणी भरत पोपट गायकवाड (वय ३४, रा. कुंजीरवाडी, ता. हवेली) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रिक्षाचालक सर्फराज दत्तू गायकवाड (वय ३७, रा. मांजरी बुद्रुक, ता. हवेली), लक्ष्मीबाई दीपक जाधव (वय ४५), रेणुका शिवलाल पवार (वय ५०) व तायव्वा सिद्राम गायकवाड (वय ६०, तिघी सध्या रा. लमाण तांडा, येरवडा, पुणे, मूळ रा. हदरा, ता. दुधणी, जि. गुलबर्गा, कर्नाटक) यांना अटक करण्यात आली आहे.पोलीस निरीक्षक बंडोपंत कोंडुभैरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गायकवाड यांचे कुंजीरवाडी येथे पुणे-सोलापूर महामार्गालगत ए-वन टेलर व कलेक्शन नावाचे कपड्यांचे दुकान आहे. २६ डिसेंबर रोजी दुपारी ३-३० वाजण्याच्या सुमारास ते त्यांच्या दुकानासमोर असलेल्या चंद्रभागा काकडे यांच्या दुकानात गेले. त्या वेळी तीन महिला तेथे होत्या. काकडे यांना त्यांचा संशय आल्याने त्यांची मुलगी नीलम हिने एका महिलेची झडती घेतली. तिने साडीमध्ये एक सहावारी साडी लपवलेली आढळून आली. तिच्या ताब्यातून साडी घेतल्यानंतर त्या तिन्ही महिला दुकानाबाहेर पडल्या.या तिन्ही महिला चोरी करण्यासाठी आल्या होत्या, याची खात्री पटल्याने त्या कोठे जातात याची पाहणी करण्यासाठी गायकवाड व दुकानातील कर्मचारी रंगनाथ घोडके दोघे बाहेर आले. त्या वेळी बाहेर उभी असलेली रिक्षामध्ये (एमएच १२ बीडी ५९६५) बसून त्या तिघी पुणे बाजूकडे निघाल्याचे दिसले. गायकवाड व घोडके त्यांच्यामागे आले. रिक्षा थेऊर फाटा येथील भावना चौधरी यांच्या दुकानासमोर थांबली. तिन्ही महिला दुकानात गेल्या. या वेळी गायकवाड यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक गणेश पिंगुवाले यांच्याशी संपर्क साधून हा प्रकार सांगितला. काही वेळातच ते पोलीस हवालदार रवींद्र गोसावी, सोनवणे यांच्यासह तेथे पोचले. दुकानातील तीन महिलांसह रिक्षाचालकास ताब्यात घेतले.पोलिसांनी केलेल्या चौकशीत यापूर्वी ३० आॅक्टोबर रोजी गायकवाड यांच्या दुकानातून २० हजार रुपये किमतीचे रेमंड कंपनीचे पॅन्टचे दोन तागे, तप चौधरी यांच्या दुकानातून ६ हजार ५०० रुपये किमतीच्या १० साड्यांची चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली आहे.
दुकानांतून कपडे चोरणाऱ्या तीन महिलांसह एकास लोणी काळभोर पोलिसांनी केले जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 6:14 PM
दुकानदाराने दाखवलेल्या समयसूचकतेमुळे विविध दुकानांतून कपडे चोरी करणाऱ्या तीन परप्रांतीय महिलांसह एक पुरुष अशा चार जणांच्या टोळीस लोणी काळभोर पोलिसांनी जेरबंद केले आहे.
ठळक मुद्देचार जणांच्या टोळीस लोणी काळभोर पोलिसांनी केले जेरबंद, रिक्षा जप्त६ हजार ५०० रुपये किमतीच्या १० साड्यांची चोरी केल्याची आरोपींनी दिली कबुली