पुणे : तीन वर्षांपूर्वीचा आजचा दिवस शहरवासीय कधीच विसरणार नाहीत. जगभरात कोरोनाचा उच्छाद सुरू झाल्यानंतर देशातही कोरोनामुळे तणावाचे वातावरण होते. त्यातच पुण्यामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर सर्वांच्याच छातीत धस्स झाले. शासकीय यंत्रणांची पळापळ झाली. रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी प्रशासन सरसावले. साथीची ही सुरुवात होती. आपल्या सर्वांच्याच पुढे काय वाढून ठेवले आहे, याची कल्पनाही तेव्हा कुणाला आली नव्हती.
कोरोनाचा महाराष्ट्रातील पहिला रुग्ण पुण्यात नऊ मार्च २०२० रोजी सापडला. हा दिवस पुणेकर कधीही विसरू शकणार नाहीत. दुबईवारी करून पुण्यात परतलेले सिंहगड रस्त्यावरील कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यांच्या घरापासून दहा किलोमीटर अंतरावरील पहिला कंटेन्मेंट झोन तत्कालीन विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर व जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जाहीर केला होता. तर, नायडू हॉस्पिटलच्या रस्त्याने जायला रिक्षावाले नकार देत होते. एक अनामिक भीती सर्वांच्याच मनात होती.
पुण्यात कोरोनाची पहिली व त्यापेक्षा अधिक संहारक दुसरी लाट नंतर आली. सोबत लॉकडाउन, कंटेन्मेंट झोन याने नागरिक बांधले गेले होते. शारीरिक व्याधीबरोबरच मानसिक आरोग्याचे प्रश्नही निर्माण झाले होते. शहरात गेल्या तीन वर्षांमध्ये सात लाख १० हजार ६९० नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर ९ हजार ७५३ नागरिकांनी जीव गमावला आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. सध्या पुणे जिल्ह्यात १३२ सक्रिय रुग्ण आहेत. पुणे शहरात दररोज १० ते १५ कोरोनाबाधितांचे निदान होत आहे.
पुणे जिल्ह्यात आतापर्यंत १५ लाख आकडा पार
- पुणे जिल्ह्यात आतापर्यंत १५ लाख ५ हजार ७५३ कोरोनाबाधित रुग्णांचे निदान.- त्यापैकी १४ लाख ८५ हजार १३ रुग्ण कोरोनामुक्त झाले.- २० हजार ६०८ रुग्णांचा मृत्यू झाला.
कोरोनाच्या लाटा
- कोरोनाची पहिली लाट मार्च ते सप्टेंबर २०२० दरम्यान चालली, पहिल्या लाटेत शहराचा सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट २४.८६ टक्के होता.
- दुसरी लाट फेब्रुवारी ते मे २०२१ यादरम्यान चालली, दुसऱ्या लाटेत २६ टक्के तर तिसऱ्या लाटेमध्ये ३० टक्के इतका होता.
- तिसरी लाट डिसेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ यादरम्यान आली. मात्र, या काळात लक्षणे सौम्य होती.