पुणे : खडकवासला धरणाच्या माेऱ्यांच्या समाेरील एका पुलाजवळ पाण्यात अडकलेल्या कुत्र्याला वाचवायला गेलेले तरुणच पाण्यात अडकून पडल्याची घटना घडली. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत तरुणांना सुखरुप पाण्याबाहेर काढले. भूतदया म्हणून कुत्र्याचा जीव वाचावयलाा गेलेल्या तरुण स्वतःचाच जीव अडकवून बसले.
रविवारी सकाळी अाठच्या सुमारास अग्निशामक दलाच्या नियंत्रण कक्षाला खडकवासला धरणाच्या मोऱ्यांच्या पुढे एका छोट्या पुलाच्या ठिकाणी किनाऱ्याला जवळपास पंचवीस फुट खोलीवर एक जिवंत कुत्रे पडले असल्याची माहिती मिळाली. अग्निशमन दलाकडून लगेचच सिंहगड अग्निशमन केंद्रातील वाहन रवाना करण्यात आले. जवानांनी पोहोचताच पाहिले तर परिस्थिती वेगळीच दिसली. घटनास्थळी तीन तरुण खाली अडकल्याने जवळच एका दगडावर उभे असून चोहोबाजूंनी पाण्याचा प्रवाह असल्याचे दिसून अाले. सकाळी हे तरुण नावे महेबूब विजापुरकर(२०),अजय मराठे(२४), सचिन यादव(२४) सर्व राहणार वारजे माळवाडी, हे तरुण खडकवासल्याला फिरायला आले असताना त्यांना एक कुत्रे खाली पडल्याचे दिसले. त्यांनी एका टेम्पो चालकाला थांबवून दाेरीच्या मदतीने खाली उतरुन कुत्र्याला सुखरुप वर पाठवले. जिगरबाज काम तर झाले खरे पण नंतर दाेरीच्या मदतीने या तरुणांना वर येणे शक्य होईना. सदर माहिती जवानांनी अग्निशमन नियंत्रण कक्षाला कळवून अग्निशमन वाहनावर असलेली “एक्स्टेंशन लॅडर” वापरुन या तीनही तरुणांना दहा मिनिटातच सुखरुप बाहेर काढले.
तरुणांचे मुक्या प्राण्याविषयी असलेले प्रेम व धाडस याचे कौतुक तिथे सर्वांनी केले. तसेच सिंहगड अग्निशमन केंद्रांचे वाहन चालक गणेश ससाणे व जवान शिवाजी आटोळे, विलास घडशी, प्रमोद मरळ यांचे ही सर्वांनी व या तीन तरुणांनी आभार मानले.