चाकण : चौक ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या अवजड कंटेनरची भरधाव स्कॉर्पिओला जबरदस्त धडक बसल्याने स्कॉर्पिओचालकाचा ताबा सुटून स्कॉर्पिओ सिग्नललगत उभ्या असलेल्या कारवर वेगात आदळून झालेल्या भीषण अपघातात कारमधील तीन जण जागीच ठार झाले आहेत
पुणे - नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चाकण येथील तळेगाव चौकात सोमवारी (दि.२६) दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान ही धक्कादायक घटना घडली. या विचित्र अपघातात वाहनांचे प्रचंड नुकसान झाले असून, क्रेनच्या सहाय्याने सबंधित वाहने बाजूला घेण्यात आली. अपघातात चक्काचूर झालेली वाहने बाजूला घेताना मात्र काही वेळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता. चुकीच्या ठिकाणी बांधण्यात आलेल्या उड्डाण पुलामुळेच तिघांचा बळी गेला अशा संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
अविनाश रोहिदास अरगडे ( वय - २३ वर्षे, रा. काळूस, ता. खेड ), प्रफुल्ल संपत सोनवणे ( वय - २२ वर्षे ) व अक्षय मारुती सोनवणे ( वय - ३४ वर्षे, दोघेही रा. वाकी बुद्रुक, ता. खेड) असे या भीषण अपघातात जागीच ठार झालेल्या तीन युवकांची नावे आहेत. यातील दोन तरुण सख्खे चुलतभाऊ असून वाकी बुद्रुक येथील व एकजण कडूस येथील आहे. येथील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर चाकण परिसरातील रस्त्यावर वाहतूक अत्यंत तुरळक होती. सोमवारी (दि.२६) दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान नाशिक बाजूकडून चाकण येथील तळेगाव चौकाकडे येत असलेला अवजड कंटेनर तळेगाव चौक ओलांडण्याच्या प्रयत्नात होता. त्यावेळी हा कंटेनर त्याच्याच पाठीमागून भरधाव आलेल्या स्कॉर्पिओ गाडीला धडकला. स्कॉर्पिओवरील चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने सबंधित स्कॉर्पिओ गाडी चाकण येथील तळेगाव चौकातील सिग्नल जवळ उभ्या असलेल्या कारवर अत्यंत वेगाने आदळल्याने वाहनातील तीन युवक गंभीर जखमी होवून जागीच ठार झाले.
या अपघातात स्कॉर्पिओ व कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून, मोठे नुकसान झाले आहे. वाहने रस्त्याच्या मध्यभागी अडकल्याने येथील वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी क्रेनच्या सहाय्याने अपघात ग्रस्त वाहने बाजूला घेण्यात आली. घटनास्थळावर रक्ताचा सडा सांडला होता.
पिंपरी - चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश व चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
-
--