भिगवण: छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि पिंपळे गावचे माजी सरपंच अनिल बागल यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली.सत्तूर आणि कोयत्याने केलेल्या हल्ल्यात बागल यांच्या डोक्यावर छातीवर आणि हाताच्या बोटावर सपासप वार करण्यात आल्याची माहिती. चार ते सहा अज्ञात हल्लेखोरांनी हा हल्ला केला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पूर्ववैमनस्य आणि राजकीय वादातून हा हल्ला झाला असल्याची माहिती मिळत आहे.
बारामती- भिगवण रस्त्यावरील पिंपळे गावच्या हद्दीत बागल यांच्या नवीन पेट्रोल पंपाचे काम सुरु आहे. शनिवारी ( दि.१) दुपारी ४ च्या सुमारास कामाची माहिती घेण्यासाठी बागल आले असता अचानक आलेल्या हल्लेखोरांनी काही कळायच्या आतच बागल यांना घेरत त्यांच्यावर सत्तूर कोयता या सारख्या धारदार शस्त्राने हल्ला केला.अचानक झालेल्या हल्ल्यातून बागल यांना सावरायला वेळ मिळाला नाही.सपासप केलेल्या हल्ल्यात बागल यांच्या उजव्या हाताची तीन बोटे तुटून पडली.तसेच हल्लेखोरांनी बागल यांच्या वर्मी वार केले आहेत.तर छातीवर आणि पोटावरही गंभीर वार करण्यात आलेले आहेत.यावेळी पंपाच्या कामावर असणाऱ्या व्यक्तींनी बागल यांना जखमी अवस्थेत भिगवण येथील खासगी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी पुणे येथील संचेती हॉस्पिटल येथे त्यांना उपचारासाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.
याबाबत माहिती मिळताच भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जीवन माने तातडीने घटनास्थळी भेट देत हल्लेखोरांची माहिती घेत शोध मोहीम सुरु केली.तर घटनेचे गांभीर्य पाहता उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर यांनी घटना स्थळाला भेट देत माहिती घेतली.
या घटनेबाबत भिगवण पोलीस ठाण्यात माहिती घेतली असता गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.