बाभुळगाव: पोलीस आणि गुन्हेगार यांच्यात पाठलागाचा थरार अनेकदा पाहायला मिळत असतो. असाच काहीसा थरार इंदापूर तालुक्यात घडला. लोणी देवकर एमआयडीसी चौकातुन डिझेल चोरी करून पुण्याकडे भरधाव वेगात निघालेल्या संशयित ट्रकची माहिती मिळाली. त्यानंतर भिगवण - राशिन रस्त्यावर थराराक पाठलाग करत चोरीचे डिझेल व संशयित ट्रक पकडण्यात इंदापूरपोलिसांना यश आले.
डिझेल चोरांचा पाठलाग करताना डाळज नजीक हायवे रोडवर चोर व पोलीस यांच्यात अंगावर काटे आणणारा थरार सुरू झाला. तर पोलीस वाहनाबरोबर मधुकर भरणे यांनी स्वतच्या गाडीतुन पोलिसांबरोबर डिझेल चोरांचा पाठलाग केला. चोरांनी पोलिसांच्या अंगावर १० चाकी ट्रक घालत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.परंतू, पोलिसांनी ट्रकचा थरारक पाठलाग सुरूच ठेवला. त्यानंतर ट्रकमधील एकजण पाठीमागे ट्रकच्या हौद्यात आला.व त्याने डिझेल, रिकामे ड्रम व टायर पोलीस व मधुकर भरणे यांच्यावर फेकत मारण्याचा प्रयत्न केला.
ट्रकचा पाठलाग सुरू असताना ट्रक भिगवण गेट तोडुन राशिन रोडने भरधाव वेगात निघाला. ट्रकचालकाने राशिन रोडवरील रेल्वे फाटक तोडुन ट्रक पुढे नेला व अंधारात ट्रक रस्त्यात सोडुन डिझेल चोरटे अंधाराचा फायदा घेवुन फरार झाले. चोरीच्या डिझेलसह ट्रक ताब्यात घेत इंदापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे हे करत आहेत.