लोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गावर थेऊर फाटा ( ता हवेली ) येथे ज्वलनशील पदार्थाची वाहतूक करणाऱ्या टँकरला रात्री आग लागली. यामध्ये टॅकर जळूूून खाक झाल आहे. आगीचे कारण समजले नाही. परिसरात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याची चर्चा आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टँकर क्रमांक (एमएच १२ एमएक्स ७११६) जळालेला आहे. टँकरसह ९ हजार लिटर डिझेल व १० हजार लिटर पेट्रोल जळाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हा टॅकर श्रीकांत राजेंद्र सुंबे यांच्या मालकीचा आहे. टँकर हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड या कंपनीमध्ये पेट्रोल - डिझेलची वाहतूक करतो. मंगळवार (२ मार्च ) रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास टँकरमध्ये लोणी काळभोर येेेेथील एचपीसीएल टर्मिनल मधूून डिझेल व पेट्रोल भरण्यात आले. हा टॅकर महाबळेश्वर येथील ईराणी पेट्रोल पंप येथे पेट्रोल व डिझेल खाली करण्यासाठी जाणार होता. परंंतू रात्रीची वेळ व घाट - रस्ता यामुळे रात्री ८ वाजण्याच्या सुमारास मालक सुंबे यांचे थेऊर फाटा येथील पार्किंग मध्ये लावण्यात आला होता. तो पहाटे महाबळेश्वरला जाणार होता.
मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास टँकरला अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस व त्यानंतर पीएमआरडीए अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तब्बल २ तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. परंतू तोपर्यंत टॅकर पूर्णपणे जळून खाक झाला होता. स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखून टँकरच्या शेजारी उभे असलेले २ ट्रक लोणी काळभोर पोलीसांच्या मदतीने सुरक्षितपणे बाजूला काढले. अन्यथा या नुकसानीची तीव्रता वाढून मोठा अनर्थ घडला असता.
हवेलीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सई भोरे - पाटील, लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सूरज बंडगर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन परिस्थिती आटोक्यात आणली. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.