पुणे : मद्यपी मुलाने पैशांसाठी आईला शिवीगाळ केली. हे पाहून रागाच्या भरात वडिलांनी मुलाचा गळा दाबला. त्यात त्याचा मृत्यू झाला. राग अनावर झाल्याने वडिलांनी आपल्याच मुलाचा खून केला. दारूला पैसे न दिल्याने बांबूने मारहाण केल्याने कोंढव्यात एकाचा खून झाला होता. चारित्र्याच्या संशयावरुन खून होण्याचे प्रकार वाढलेले दिसून येतात.
सहा महिन्यांत ४३ खून
पुणे पोलीस आयुक्तालयांतर्गत जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत खून प्रकरणी ४३ गुन्हे दाखल करण्यात आले. गेल्या वर्षी या कालावधीत खून प्रकरणी ४५ गुन्हे दाखल झाले होते. १७ जुलै अखेर शहरात ४९ खुनाचे गुन्हे दाखल आहे.
सर्व गुन्हे उघड
यंदा सहा महिन्यात दाखल असलेले सर्व खुनाचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यात सर्वाधिक खुनाच्या घटना परिमंडळ ५ मध्ये २२ झाल्या असून त्याखालोखाल परिमंडळ ४ मध्ये १० घटना घडल्या आहेत.
किरकोळ कारणातून खून
काही घटनांमध्ये किरकोळ कारणातून बेदम मारहाण केली जाते. त्यामुळे गंभीर जखमी होऊन संबंधिताचा मृत्यू होतो. यात काही घटनांमध्ये आरोपी आणि खून झालेली व्यक्ती हे एकमेकांच्या ओळखीचेही नसल्याचे समोर आले आहे.
म्हणून वाढत आहेत घटना
पैशांची देवाण-घेवाण, संशय, सततचे वाद या कारणांतून टोकाचे निर्णय घेतले जातात. काही प्रकरणांमध्ये कट रचूनदेखील खून केला जातो. मात्र बहुतांश प्रकरणांमध्ये राग अनावर होत असल्याने असे प्रकार घडत असल्याचे सांगण्यात येते.
सावत्र आईचा खून
भोरमधील धन्वंतरी प्लाझा या इमारतीतील मुलाने आपल्या सावत्र आईची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली होती. वडिलांनी दुसरे लग्न केल्याचा राग मनाशी बाळगून मुलाने सावत्र आईची हत्या केली. या घटनेत २२ वर्षांच्या मुलाने सावत्र आईचा आधी गळा चिरला त्यानंतर त्याने तिच्या डोक्यात दगडी वरंवटा घालून तिची निर्घृण हत्या केली.
प्रेम प्रकरणावरून पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा खून
प्रेम प्रकरणातून एका तरुणावर शस्त्राने वार करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना हडपसरमधील ग्लायडिंग सेंटरच्या मैदानावर घडली. या प्रकरणी एका महिलेसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.