खोडद : नैसर्गिक सौंदर्याची मुक्तहस्ते उधळण झालेल्या जुन्नर तालुक्यातील पर्यटनस्थळे, नैसर्गिक विविधता, जैवविविधता, गडकोट किल्ले, घाटमार्ग, वनसंपदा, पर्यावरणातील विविध घटक, विविध तीर्थक्षेत्र, पशुपक्षी, कीटक, रानफुलं, औषधी वनस्पती, दुर्मिळ वनस्पती आणि विविध रंगांनी नटलेली फुलपाखरं आदी माहिती व जुन्नरचे नैसर्गिक वैभव निसर्गरम्य जुन्नर तालुका फेसबुक पेजच्या माध्यामातून खोडद येथील माजी सैनिक रमेश खरमाळे यांनी जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सुमारे ४५ देशांमधून या पेजला लाईक, प्रतिक्रिया व कौतुकाची थाप मिळाली आहे.निसर्गरम्य जुन्नर तालुका या फेसबुक पेजच्या माध्यमातून गेली ३ वर्षे खोडद (ता.जुन्नर) येथील माजी सैनिक रमेश खरमाळे जुन्नर तालुक्याची संपूर्ण माहिती जगासमोर या पेजच्या माध्यमातून सन २०१४ पासून प्रसारित करीत आहेत. यामध्ये पर्यावरण, निसर्ग, जैवविविधता, पक्षी, प्राणी, कीटक तसेच ऐतिहासिक घडामोडींमध्ये जुन्नरला लाभलेला संपूर्ण ऐतिहासिक वारसा, गडकोट, किल्ले, लेणी, प्राचीन मंदिरे,पुरातन जलस्रोत, मलिकांबर पाणीपुरवठा योजना, नैसर्गिक व कृत्रिम भुयारे व त्यांची सद्य:स्थिती, विविध घाट, पठारे व या पठारांवर फुलणारी रानफुलं याबाबत प्रत्यक्ष अनुभवातून रमेश खरमाळे सर्व माहिती विविध छायाचित्रांसह व व्हिडीओ क्लिपद्वारे या पेजच्या माध्यमातून जगासमोर मांडत आहेत. भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेत येथील घंटेसारखे वाजणारे दगड, दहा लाख वर्षांपूर्वी उद्रेक झालेल्या भूकंपाची राख, स्टँडिंग डाईक, तर नैसर्गिक पूल अशा विषयांची सांगड घालून ती छायाचित्रांद्वारे मांडण्याचा व ते वाचकांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झाले आहेत. तालुक्यात पेजच्या माध्यमातून विविध ट्रेकचे नि:शुल्क आयोजन करण्यात येत आहे. आतापर्यंत जवळपास ३५ वेळा जुन्नर तालुक्यात विविध ठिकाणी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील पर्यटकांच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे. अतिदुर्गम भागातील गरीब कुटुंबांना कपडेवाटप, शालेय मुलांना वह्या, पेन, पेन्सिल, तसेच वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी शाळेत लायब्ररी उभारणीसाठी विविध पुस्तके देण्यातआली आहेत. आपत्कालीन परिस्थितीत पर्यटकांमार्फत आर्थिक मदत गरजूंना पेजच्या माध्यमातून प्रत्यक्ष त्या व्यक्तीला केली आहे. माळशेज घाट एस. टी. अपघातात मदत करण्यात महत्त्वाचा वाटा उचलून ३८ मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात रमेश खरमाळे यांनी सहकार्य केले होते. तसेच किल्ले हडसर रात्री खिळ्यांच्या वाटेने अडकलेल्या पुण्यातील १६ पर्यटकांना सुखरूप उतरविण्यात मोलाचे सहकार्य केले. विविध ट्रेकच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या प्रजातींच्या बियांची पर्यटकांकडून ट्रेक क्षेत्रात लागवड करण्याचे कार्य पेजच्या माध्यमातून करण्यात आले आहे. ही सर्व माहिती प्रत्येक घराघरांत पोहोचावी, म्हणून ‘निसर्गरम्य जुन्नर तालुका’ हे अँड्रॉइड अॅप प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
‘फेसबुक’च्या माध्यमातून जुन्नरचे वैभव जगासमोर
By admin | Published: April 27, 2017 4:43 AM