महाराष्ट्र अंनिसच्या शिवाजीनगर, पुणे शाखेने ‘निर्भय मॉर्निंग वॉक’ आयोजित केला होता. डॉ. दाभोलकर यांचा खून झाला, त्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पूल येथून ते महानगरपालिकेच्या आवारातील महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्यापर्यंत हा वॉक झाला. यावेळी घोषणा, गाणीही सादर झाली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. सुभाष वारे, महाराष्ट्र अंनिसचे सरचिटणीस डॉ. ठकसेन गोराणे, प्रकाशन विभागाचे विशाल विमल, सामाजिक कार्यकर्ते मुकुंद किर्दत, मिलिंद चव्हाण, संकेत मुनोत, शिवाजीनगर पुणे शाखेच्या अध्यक्ष वनिता फाळके, कार्याध्यक्ष संदीप कांबळे, सचिव विनोद खरटमोल आणि विविध संस्था संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. प्रणिता वारे, मयूर पठारे, घनश्याम येणगे, अविनाश इंगळे यांनी गाणी सादर केली.
दाभोलकरांच्या खुनाचा तपास न लागणे हे संतापजनक आहे. मात्र विवेकी विचारांच्या पेरणीतून आनंदी समाज बनवा, यासाठीची आमची वाटचाल न थकता सुरू आहे, असे प्रा. सुभाष वारे म्हणाले. खूनप्रकरणी आजवर जे आरोपी ताब्यात घेतले आहेत, त्यातून कोणत्या धर्मांध संघटनांचा हात या खुनामध्ये आहे, हे समाजासमोर आले आहे. सरकार, तपास यंत्रणेने इच्छाशक्ती दाखवून मुख्य सूत्रधारापर्यंत पोचावे, असे विशाल विमल यांनी सांगितले.