पुणे: येरवडा कारागृहातील कैद्यांकडून चोरुन माेबाईलवरुन बाहेर संपर्क साधला जात असल्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या. त्यामुळे कारागृह प्रशासनाने स्मार्ट कार्ड मोबाईलद्वारे नातेवाईकांशी संपर्क साधण्याची योजना सुरु केली. तिचा प्रारंभ येरवडा कारागृहात केला. त्यानंतर दोनच दिवसात दोन बॉलच्या माध्यमातून येरवडा कारागृहाच्या उंचचउंच भिंतीवरुन आत ४ मोबाईल टाकण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी, कारागृह अधिकारी वीरु खळबुटे (वय ३७) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवडा कारागृहात स्मार्ट कार्ड मोबाईल योजना २३ जूनपासून कार्यन्वित करण्यात आली. त्यानंतर दोनच दिवसांनी हा प्रकार उघडकीस आला आहे.
येरवडा कारागृहातील माडी गेट आणि अंतर्गत भिंतीत चार मोबाइल बॉलच्या सहाय्याने टाकल्याचे आढळून आले. येरवडा कारागृहाच्या पाठीमागील बाजूस प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारासमोर कारागृह कर्मचारी वसाहत आहे. तेथून काही अंतरावर कारागृहाचे मुद्रणालय आहे. कारागृहाच्या आवारात मंगळवारी रक्षक गस्त घालत होते. त्या वेळी मुद्रणालयाच्या परिसरातील उंच सीमा भिंतीतील एका कप्यात २ पोपटी रंगाच्या बॉलमध्ये पाकीट त्यात कापसामध्ये ठेवलेले चार मोबाईल आढळून आले. या चारपैकी तीन मोबाइलमध्ये सीमकार्ड आढळून आले आहे. कारागृहात मोबाईल वापराला बंदी असतानाही कैद्यांपर्यंत हे मोबाईल पोहचविण्यासाठी बाहेरुन आतमध्ये टाकून दिल्याचे आढळून आले आहे. दरम्यान यापूर्वी देखील असे मोबाईल, अंमली पदार्थ बॉलच्या माध्यमातून आत टाकण्याचे प्रकार घडले होते.