पुणे : वाहतूक पोलिसांसोबत हुज्जत घालणाऱ्या तरुणाला पोलीस चौकीत आणल्यानंतर त्याने तेथील खुर्च्यांची फेकाफेक करत पोलीस उपनिरीक्षकासोबत हुज्जत घालत त्यांची कॉलर पकडून मारहाण व शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कात्रज पोलीस चौकीत शनिवारी रात्री हा प्रकार घडला. या प्रकारानंतर संबंधित तरुणावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहेत.
हर्षल बापूराव रोहिले (वय 21, शरद नगर चिखली पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी वाहतूक विभागातील पोलीस शिपाई गणेश सर्जेराव नरुटे (वय 32) यांनी फिर्याद दिली आहे. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे वाहतूक विभागात नेमणूकीला असून ते कात्रज चौकात ड्युटीवर होते. यावेळी त्यांना आरोपी हा हॉर्न वाजवून भरधाव वेगात कार चालवताना दिसला. त्यामुळे फिर्यादीने आरोपीला गाडी थांबावयास सांगितले. परंतु गाडी न थांबवता तो तसाच पुढे निघून गेला. त्यानंतर इतर सहकाऱ्यांच्या मदतीने फिर्यादीने आरोपीची गाडी थांबवली आणि त्याच्याकडे कागदपत्रांची मागणी केली. परंतु आरोपीने कागदपत्र न दाखवता तुम्हाला माझ्यावर कारवाई करण्याचा अधिकार नाही, मी तुम्हाला बघून घेईन, तुझी नोकरी करतो तू मला ओळखत नाही असे बोलून वाहतूक पोलिसांच्या अंगावर धावून गेला.
या सर्व प्रकारानंतर चला कात्रज पोलीस चौकीत नेण्यात आले असता त्याने त्या ठिकाणीही गोंधळ घालण्यास सुरुवात केली. कात्रज चौकीतील खुर्च्यांची फेकाफेक करीत वर्दीवर असलेले पोलीस उपनिरीक्षक गौरव देव यांच्या अंगावर धावून गेला. त्यांची गचांडी पकडून त्यांना हाताने मारहाण करत अश्लील भाषेत शिवीगाळ केली आणि सरकारी कामात अडथळा आणला. भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. अधिक तपास सुरू आहे.