पिंपरी : कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने चिंचवड स्टेशन येथील आनंदनगर झोपडपट्टीत प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. या प्रतिबंधात क्षेत्रात सुविधा मिळत नूसन, आम्हाला बाहेर जाऊ द्या, असे म्हणून येथील नागरिकांनी सोमवारी दुपारी घराबाहेर पडत एकत्र येऊन संताप व्यक्त केला. या उद्रेकात महिला व तरुणांकडून दगडफेकीचा प्रकार होऊन पोलिसांच्या वाहनांचे नुकसान करण्यात आले. तसेच झोपडपट्टीलगच्या पुलावरील बघ्यांची गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात चिंचवड स्टेशन येथील आनंदनगर झोपडपट्टीत मोठ्या संख्येने कोरोनाग्रस्त आढळून येत आहेत. त्यामुळे महिन्याभरापासून ही झोपडपट्टी प्रतिबंधित क्षेत्र (कन्टेन्मेंट झोन) आहे. या प्रतिबंधित क्षेत्रातून रहिवाशांना बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच बाहेरील नागरिकांना या क्षेत्रात प्रवेश बंदी आहे. तसेच औषध विक्री व किराणाची दुकाने देखील बंद होती. तसेच येथे पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बंदोबस्तावरील पोलीस आम्हाला बाहेर जाऊ देत नाहीत, अशी तक्रार करीत येथील रहिवाशांनी संताप व्यक्त केला. त्यासाठी त्यांनी एकत्र येत पोलीस कक्षातील टेबल व खुर्च्यांचे व पोलिसांच्या वाहनांचे नुकसान केले. तसेच दगडफेकीचाही प्रकार झाला. त्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. जमावाने पोलिसांकडे संतप्त भावना व्यक्त केल्या. सुमारे दोन तास येथे जमाव होता.पिंपरी-चिंचवडचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे व पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांच्यासह इतर पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे ह्यअह्ण क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी चंद्रकांत इंदलकर यांनी देखील जमावाचे म्हणणे ऐकून घेत, त्यांच्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, झोपडपट्टीलगत असलेल्या पुलावर वाहनचालकांनी त्यांची वाहने रस्त्यातच थांबविली होती. झोपडपट्टीतील जमावाचा उद्रेक पाहण्यासाठी पुलावर वाहनचालकांची गर्दी झाली. त्यामुळे या गर्दीला पांगविण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीमार करण्यात आला. त्यानंतर पुलावरील गर्दी कमी होण्यास मदत झाली.
................................
औषध विक्री, किराणा दुकानांना परवानगीप्रतिबंधित क्षेत्रासाठी प्रशासनाकडून निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यानुसार अशा भागात किराणा दुकाने, औषधविक्रीची दुकाने आदी सर्व आस्थापना बंद असतात. जेणेकरून प्रतिबंधित क्षेत्रात कोरोना विषाणूचा संसर्ग होणार नाही. त्यानुसार आनंदनगर झोपडपट्टीत देखील औषध विक्री व किराणा दुकाने बंद होती. मात्र तेथील नागरिकांच्या मागणीनुसार महापालिकेकडून चार किराणा दुकाने व औषध विक्रीच्या एका दुकानाला परवानगी देण्यात आली आहे. तसेच एक एटीएम केंद्र सुरू करण्यासही प्रशासनाकडून मुभा देण्यात आली आहे. यापूर्वीही गेल्या महिन्यात येथील नागरिक एकत्र आले होते. त्यावेळी देखील मोठा जमाव होऊन त्यांनी संताप व्यक्त केला होता.
..................................................................
जेवण नको धान्य द्या...एका सामाजिक संस्थेकडून आनंदनगर झोपडपट्टीत दररोज अडीच हजार फूड पॅकेट वाटप करण्यात येतात. यात नाश्ता व दोन वेळचे जेवण देण्यात येते. मात्र आम्हाला जेवण नको तर किराणा व धान्य द्यावे, अशी रहिवाशांची मागणी होती. त्यानुसार महापालिकेकडून किराणा व औषध विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. तसेच आम्हाला कामासाठी प्रतिबंधित क्षेत्राबाहेर जाऊ द्यावे, अशीही मागणी स्थानिकांनी केली आहे, अशी माहिती महापालिकेच्या अ क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी चंद्रकांत इंदलकर यांनी दिली.
महापालिकेकडून सुविधा उपलब्ध करून देण्याचा सतत प्रयत्न सुरूच आहे. झोपडपट्टीतील नागरिकांनी त्यांच्या प्रतिनिधींचा गट तयार करावा. त्यांच्याशी चर्चा करून अडचणी समजून घेणे सहज शक्य होईल. त्यामुळे समस्या सोडविण्यास मदत होईल.- चंद्रकांत इंदलकर, क्षेत्रीय अधिकारी, अ क्षेत्रीय कार्यालय, पिंपरी-चिंचवड महापालिका