- शैलेश काटेलोकमत न्यूज नेटवर्कइंदापूर (जि. पुणे) : कडाक्याच्या थंडीत रात्रीच्या अंधारात कुडकुडणारे अर्भक. दाेन तासांपूर्वी जन्मलेले हे बाळ आईनेच वनविभाग क्षेत्रातील कच्च्या रस्त्यालगतच्या चारीत काट्याकुट्यांत फेकून दिले; पण अखेर बचावले! एका वृद्धाने या अर्भकाला पाहिले आणि रडवेल्या डोळ्यांनी त्यांनी इतरांना सांगितले. त्यानंतर पोलिस कॉन्स्टेबल महिलेने तातडीने सूत्रे हलवली, म्हणूनच ती चिमुरडी आता जग पाहू शकते आहे!
रात्रीच्या वेळेस एका वृद्धाने बाळ कण्हल्याचा आवाज ऐकला. त्याने काही युवकांना बोलावले. युवक चारीकडे गेले. चारीत एका गोणपाटातून आवाज येत होता. उलगडून पाहिल्यानंतर हे अर्भक दिसले. सोबत वार व नाळही होती. नाळ जोडलेली असतानाच आईने तिला काट्याकुट्यांनी वेढलेल्या खाईत फेकून दिले होते.
डोके, पाठ आणि सर्वांगाला चिमटे काटे अन् सराट्याचे काटे टोचलेले होते. माता-पित्याची क्रूरता थरकाप उडवणारी हाेती. वंशाला दिवा हवा असताना, मुलगी झाली म्हणून जन्मदात्यांनीच या ‘नकोशी’ला मृत्यूच्या खाईत फेकून दिले, असा प्राथमिक अंदाज आहे.
असा झाला उलगडाहवालदार माधुरी लडकत यांचा फोन आला. ‘बीजवडी वनविभागात एक स्त्री अर्भक आढळले आहे. लवकर या’, असे त्यांनी सांगितले. मी तत्काळ तेथे पोहोचलो. अवघ्या दोन तासांपूर्वी जन्मलेल्या मुलीला टाकून देणाऱ्या आईबद्दल अतीव कीव आणि संतापही आला. आम्ही आणलेली दूध पावडर, शाल, दुपट्टा बाळाला ऊब देईल; पण तिला खरी गरज आहे ती आईच्या कुशीची अन् दुधाची.- प्रशांत शिताप, सामाजिक कार्यकर्ते.
३ तास प्रयत्नांची पराकाष्ठाइंदापूर तालुक्यातील बीजवडी गावच्या हद्दीत शनिवारी (दि. १६) रात्री आठच्या सुमारास हे स्त्री अर्भक आढळले. पोलिस यंत्रणा, उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी तीन तास प्रयत्नांची पराकाष्ठा करीत तिला जीवदान दिले. ती सध्या सुखरूप असून, सोलापूरमध्ये उपचार सुरू आहेत. अज्ञात स्त्रीविरुद्ध बापू ज्ञानदेव पालवे या तरुणाने फिर्याद दिली आहे.