पुणे : पुण्यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण दिसून आले होते. तसेच गरमीसुद्धा मोठ्या प्रमाणावर जाणवत होती. दुपारनंतर सोसाट्याच्या वाऱ्याला सुरुवात झाली. आता ढगांचा गडगडाट करत पावसाचे जोरदार आगमन झाले आहे. राज्यामध्ये तापमानात वाढ होत असून, आज सायंकाळी पावसाचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीठ आणि सोसाट्याचा वारा सुटेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर पुण्यात ढगांच्या गडगडाटात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.
पुणेकरांना बऱ्याच दिवसानंतर उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. मागील महिन्यापासून तापमान ४०, ४१ च्या घरातच होते. दिवसभर घराबाहेर पडणे तर मुश्किल झाले होते. तर रात्री झोपणेही अवघड झाले होते. अशातच वरुणराजाने कृपा दाखवली आहे. शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. आज अक्षय्य तृतीया असल्याने सुट्टीमुळे बरेच नागरिक घरीच आहेत. आमरस पुरीच्या बेताबरोबरच पावसाचा आनंद घेताना नागरिक दिसून आले आहेत.
वातावरणात दमट वातावरण असून, हवेत आर्द्रता देखील आहे. त्यामुळे दिवसा उकाडा अधिक जाणवणार आहे. तसेच रात्री देखील उष्ण झाल्या आहेत. आजपासून (दि.१०) राज्यामध्ये बऱ्याच भागात पावसाचा इशारा दिला आहे. पुणे, नाशिक, सातारा, नगर, छ. संभाजीनगर, लातूर, धाराशिव, सोलापूर आणि विदर्भातील नागपूर, नंदूरबार, वर्धा, अमरावती, वाशिम, गोंदिया या ठिकाणी पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला होता. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, तसेच दुपारी घराबाहेर पडू नये, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
पिंपरी- चिंचवड परिसरातील दापोडी, सांगवी, नवी सांगवी, बोपखेल, चऱ्होली, चिखली, दिघी, आकुर्डी, निगडी, यमुनानगर, वाल्हेकरवाडी, मोशी, फुगेवाडी, कासारवाडी, वाकड, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, पिंपळे सौदागर, वाल्हेकरवाडी, थेरगाव, पुनावळे, ताथवडे या भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसाचे टपोरे थेंब पडण्यास सुरुवात झाली. पावसाने जोर धरला. रस्त्यांवर पाणी पाणी झाले. सुमारे अर्धा तास पाऊस पडला. तर सायंकाळ पर्यंत ढगांचा गडगडाट सुरु होता. त्यामुळे वातावरणात गारवा जाणवू लागला होता.