पुणे : शहरात गुरुवारी कोरोनाबाधितांची संख्या कोरोनामुक्त होणाऱ्यांपेक्षा दुप्पट आढळून आली आहे. गुरुवारी दिवसभरात ३३३ कोरोनाबाधित आढळून आले असून, १८७ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत. सद्य:स्थितीत शहरात २ हजार ५१६ सक्रिय रुग्ण असून कालच्या तुलनेत यामध्ये १४१ ने वाढ झाली आहे.
आज विविध तपासणी केंद्रांवर ५ हजार ६९६ संशयितांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ही ५.८४ टक्के इतकी आहे. आज १३ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ८ जण हे पुण्याबाहेरील आहेत. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.७९ टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रुग्णसंख्या ही ३२३ इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ४६१ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत २६ लाख ३४ हजार ४९५ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ७६ हजार ८२६ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ६५ हजार ७५६ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ५५४ जणांचा मृत्यू झाला आहे.
--------