पुणे : पुण्यात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. दिवसाला २०० - ५०० असे आढळणारे रुग्ण आता हजारांच्या घरात पोहोचले आहेत. गेल्या दोन दिवसापासून हाच आकडा ५ हजारांपेक्षा जास्त आहे. तर आज पुणे शहरातील कोरोना रुग्णसंख्येने दोन वर्षातील आजवरचा उचांक गाठला आहे. गुरुवारी शहरात तब्बल ७ हजार २६४ रुग्ण आढळून आले आहेत. पुणेकरांसाठी हि चिंतेची बाब ठरत आहे.
गुरुवारी शहरात ७ हजार २६४ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. दिवसभरात २० हजार ३४२ जणांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत बाधितांची टक्केवारी ३५.७० टक्के इतकी आहे. तपासणीच्या तुलनेत बाधितांची टक्केवारीही आज सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे.
शहरातील कोरोनाबाधितांची सक्रिय रुग्ण संख्या ४२ हजार २६४ इतकी झाली असून, दिवसभरात ४ हजार ५७५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. यापैकी ७४ जण आयसीयूमध्ये तर २८२ रूग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत.
आज ११ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, यापैकी ४ जण पुण्याबाहेरील आहे. आजपर्यंत शहरात ४१ लाख ७९ हजार ७६७ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी ५ लाख ८३ हजार ५३३ जण कोरोनाबाधित आढळून आले. यातील ५ लाख ३२ हजार १०१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ९ हजार १६८ जण दगावले आहेत.