लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाबाधितांची संख्या गुरुवारी पुन्हा एक हजाराच्या आत आली असून, दिवसभरात शहरात केवळ ९३१ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ या आठवड्यात रुग्णवाढ सातत्याने कमी झाल्याचे दिसून आले असून, आजमितीला शहरातील सक्रिय रुग्णसंख्याही १५ हजार ४३ वर आली आहे़ दिवसभरात १ हजार ७६ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़
आज १२ हजार २२६ जणांनी कोरोनाची तपासणी करून घेतली़ तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ही केवळ ७़ ६१ टक्के इतकी आढळून आली आहे़ रविवारपासून तपासणीचे प्रमाण दहा हजाराच्या आसपास असतानाही आज यात दोन हजाराने वाढ झाली तरी, नव्या कोरोनाबाधितांची टक्केवारी मोठ्या प्रमाणात घटली आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार : दिवसभरात ६८ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी २४ जण पुण्याबाहेरील आहेत़ आजचा मृत्यूदर हा १़ ७० टक्के इतका आहे़
ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्याही आता शहरात पाच हजाराच्या आत आली असून, शहरातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या ४ हजार ३६० कोरोनाबाधित रुग्ण हे ऑक्सिजनसह उपचार घेत आहेत़ तर, १ हजार ३२८ रुग्ण हे गंभीर आहेत़ शहरात आत्तापर्यंत २४ लाख ४ हजार ३२४ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ६३ हजार १०३ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ तर यापैकी ४ लाख ४० हजार १७३ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ तर आतापर्यंत शहरात ७ हजार ८८७ जणांचा मृत्यू झाला आहे़
-----------