राजेगाव : अर्ज माघारीनंतर प्रत्यक्ष प्रचारासाठी मिळालेला कमी वेळ, मतदारसंघाचा वाढलेला विस्तार आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांची भासणारी वानवा अशा अडचणीत सापडलेल्या उमेदवारांच्या मदतीला आता सगेसोयरे धावून आल्याचे चित्र जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत सर्वत्र पाहायला मिळत आहे. आज अर्ज माघार घेतल्यानंतर प्रत्यक्ष रणधुमाळीला सुरूवात झाली. प्रत्येक मतदारसंघात असणाऱ्या १५-२0 गावांतील ४0 ते ४२ हजार मतदारांपर्यंत पोहोचायचे कसे? हा प्रश्न प्रत्येकच उमेदवाराला भेडसावत आहे. स्वत:च्या घरची शिदोरी बांधून निरपेक्षपणे प्रचार करायचे दिवस आता राहिले नाहीत. अशा वेळी प्रत्येक उमेदवारांना हक्काचे प्रचारक म्हणून त्यांच्या नातेवाइकांची प्रकर्षाने आठवण झाली आहे. नातेवाइकांच्या कधीही सुखदु:खात सहभागी न होणारे उमेदवार आता पाहुण्या-रावळ्यांकडे मदतीची याचना करत असल्याचे चित्र आहे. लांबून लांबून नाते जोडून नातेवाइकांची जवळीक साधून प्रचारात सहभागी व्हावे, अशी विनंती नातेवाइकांना केली जात आहे. यामध्ये हक्काच्या म्हणजे सासुरवाडीच्या माणसांची उमेदवारांना मोलाची मदत मिळत असल्याचे दिसून येत आहे. सासरे, मेहुणे, साडू अगदी सासू, मेहुणी यांचीही प्रचारात मदत मिळत आहे. याशिवाय मामा, काका, मावसभाऊ, आतेभाऊ , मामेभाऊ या सगळ्याच नातेवाइकांची प्रचार यंत्रणा जोरदारपणे प्रचारात सहभागी झाल्याचे दिसून येत आहे. महिला उमेदवारांबरोबर ग्रामीण भागात दररोज फिरायला शक्यतो कोणी महिला तयार नसते. अशा वेळी कार्यकर्त्यांच्या घरच्या महिला आणि उमेदवारांच्या नातेवाईक महिलांचाच मोठा आधार महिला उमेदवारांना वाटत आहे. शुभकार्य आणि सार्वजनिक कार्यक्रमाशिवाय उंबराही न ओलांडणाऱ्या महिला प्रचाराच्या निमित्ताने घराबाहेर पडून प्रचारात सहभागी झाल्याचे दिसून येत आहे.
उमेदवारांसाठी धावून आल्या ताई, माई, अक्का
By admin | Published: February 16, 2017 2:58 AM