किरण शिंदे
पुणे: लोकसभा निवडणुकीदरम्यान नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र ऐनवेळी त्यांनी माघार घेत आपण ही निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर त्यांनी आता निवडणुकीतून माघार का घेतली याचे कारण सांगितले. दिल्लीतून माझे तिकीट फायनल ही झाले होते. मात्र महिना झाला तरी जाहीर होत नव्हते. समोरचा उमेदवार मात्र महिनाभरापासून कामाला लागला होता. त्यामुळे मी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता असे स्पष्टीकरण छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी दिले. छगन भुजबळ आज पुण्यात बोलत होते.
छगन भुजबळ म्हणाले, नाशिक लोकसभा लढवण्यासाठी (Nashik Lok Sabha) मी तयार झालो होतो. दिल्लीतून माझे तिकीटही फायनल झाल्याचे सांगितल्याने मी तयारीला सुरुवातही केली होती. मात्र त्यानंतर महिना झाला तरी तिकिटाचा निकाल जाहीर होत नव्हता. त्यामुळे मी शेवटी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. मी माघार घेतल्यानंतर सुद्धा दहा ते पंधरा दिवसांनी उमेदवारी जाहीर करण्यात आली. तोपर्यंत समोरचा उमेदवार महिनाभरापासून तयारीला लागला होता. शेवटी याचे परिणाम जय पराजयावर होत असतात. असे सांगत छगन भुजबळ यांनी माघार घेण्याचे कारण सांगितले.
लोकसभा निवडणुकीदरम्यान माहिती कडून नाशिक लोकसभेसाठी छगन भुजबळ यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र महायुती असल्याने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेने देखील नाशिकच्या जागेवर दावा केला होता. शेवटी बरेच दिवस या जागेवरून महायुतीत खलबत झाली. दरम्यान उमेदवारी जाहीर होण्यास उशीर होत असल्याने छगन भुजबळांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. शेवटी शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यात आली. या निवडणुकीत हेमंत गोडसेंचा पराभव झाला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजाभाऊ वाजे मोठ्या मताधिक्याने निवडून आले.
दरम्यान लोकसभा निवडणूक लढवू न शकलेले छगन भुजबळ राज्यसभेवर जातील अशा चर्चा ही मागील काही दिवसांपासून रंगल्या होत्या. मात्र या चर्चा देखील फुल ठरल्या असून राज्यसभेवर सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली. राज्यसभेवर निवड न झाल्याने छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा आहेत.