लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे स्थानकावर अडकून पडलेल्या जवळपास १६०० प्रवाशांना एसटीने मुंबईला पाठविण्यात आले. पुणे रेल्वे प्रशासनाने जवळपास ४२ एसटीची सोय करून त्यांना इच्छित स्थळी सोडण्याची व्यवस्था केली. तसेच रेल्वे स्थानकावर त्यांच्या जेवण्याची सोय केली होती. जवळपास अकरा रेल्वे गाड्यांतील प्रवाशांना रेल्वेच्या वतीने एसटीची सोय करून पाठवून देण्यात आले.
गेल्या तीन ते चार दिवसांपासून मुंबई व परिसरात अतिवृष्टी होत आहे. बुधवारी मध्य रात्री पुणे - मुंबई रेल्वे मार्गावरील कर्जत-लोणावळा सेक्शनमध्ये मोठ्या प्रमाणात दरडी कोसळून रुळांचे मोठे नुकसान झाले. तर बदलापूर स्थानकाजवळच्या नदीला पूर येऊन तिथल्या मार्गावर पुराचे पाणी आले. त्यामुळे रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. बुधवारी मध्यरात्री १ च्या सुमारास रेल्वेने वाहतूक बंद केली.
बॉक्स १
मुंबईला निघालेल्या ११ रेल्वेला पुण्याला रोखले :
दक्षिण भारतातून रात्रीचा प्रवास करून मुंबई गाठणाऱ्या गाड्यांना पुणे स्थानकावरच थांबविण्यात आल्या. जवळपास ११ गाड्यांचा समावेश होता. यात कोणार्क एक्सप्रेस, विशाखापट्टणम एक्सप्रेस, हैद्राबाद-मुंबई एक्सप्रेस, सिद्धेश्वर एक्सप्रेस, गदग एक्सप्रेस, कोल्हापूर-मुंबई एक्सप्रेस आदी गाड्यांचा समावेश होता. या गाड्यांतील प्रवाशांना पुणे स्थानकावर उतरवून त्यांना पुढे जाण्यासाठी रेल्वेने मदत केली. त्यांच्यासाठी एसटीची सोय करण्यात आली.
बॉक्स २
या गाड्या रद्द :
डेक्कन क्वीन ,डेक्कन एक्सप्रेस, इंद्रायणी एक्सप्रेस, मुंबई - हैद्राबाद एक्सप्रेस, मुंबई - लातूर एक्सप्रेस, मुंबई - वाराणसी, मुंबई - हेंद्रबाद , मुंबई - गदग एक्सप्रेस, मुंबई-कोल्हापूर , मुंबई - नांदेड -मुंबई एक्सप्रेस, मुंबई -नागपूर एक्सप्रेस, मुंबई -मनमाड - मुंबई , मुंबई - हावडा एक्सप्रेस आदी जवळपास २५ गाड्या रद्द करण्यात आल्या.
बॉक्स ३
पुणे स्थानकावर हेल्प डेस्क :
रात्री १ वाजल्यापासूनच पुणे रेल्वे प्रशासन अलर्ट झाले होते. प्रवाशांना माहिती देण्यासाठी पुणे स्थानकावर हेल्प डेस्क सुरू करण्यात आले.तसेच त्यांच्या जेवणाची सोय करण्यात आली. वेळोवेळी उद्घोषणा करण्यात येत होत्या.