पुणे : ‘भावाला राखी बांधा अन् त्यातील बीज कुंडीत लावून ते झाड वाढवा’ आहे ना भन्नाट आयडिया. या अनाेख्या राखीचीच सध्या चर्चा आहे. किड्स, पर्यावरणपूरक सीड राखी, कपल राखी (भैया-भाभी), राजा-राणी, राधाकृष्ण अशा विविध राख्या मार्केटमध्ये उपलब्ध झाल्या आहेत. सध्या कोलकाता, दिल्ली, हैदराबाद, अहमदाबाद, गुजरात येथून राख्या येत आहेत.
पर्यावरण संदेश देणारी गोमय बीज राखी
आकाराने लहान पण आकर्षक असणाऱ्या राखीलाच ग्राहकांची पसंती आहे. याचे दर रुपये ३० ते २५० पर्यंत आहेत. पर्यावरण संदेश देणारी ही राखी खरेदीसाठी गर्दी हाेत आहे. भावाला ही राखी बांधा अन् राखीमधील बीज काढून कुंडीत टाकत ते रोप वाढवून झाडे लावा, असा संदेश यातून दिला जात आहे.
भैया भाभी (कपल) राखी
यंदाच्या बाजारात रक्षाबंधनानिमित्त 'भैया भाभी (कपल) राखी' आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. या राखीला मागणी वाढत आहे. आकर्षक मोती, तेजपुंज खडे यांचा वापर करून बनवलेल्या या राखीवर भैया भाभीची प्रतिमा आहे. नावीन्यपूर्ण डिझाईनमुळे या राखीला मागणी वाढत आहे. आकाराने लहान आणि विविध डिसाईन, रंगरंगोटी, खडे, विविध रंगात असलेल्या या राखीचा दर ५० ते २५० रुपये आहे.
''काेराेना संकटामुळे दाेन वर्षे रक्षाबंधनही साजरा झाला नाही. यंदा रक्षाबंधन दि. ११ सप्टेंबरला आहे. निर्बंध उठले असल्याने ग्राहक आतापासूनच राखी खरेदी करीत आहेत. किड्स, पर्यावरणपूरक, सीड राखी, कपल राखी (भैया-भाभी), राजा-राणी, राधाकृष्ण आदी राख्या उपलब्ध आहेत. मागणी जास्त असली तरी सध्या पुरवठा कमी आहे. - अभिजित बांदल, व्यापारी, रविवार पेठ''
''कोरानामुळे मागील दोन वर्षे आमच्या पसंतीच्या राख्या मिळाल्या नाहीत. यंदा बाजारात वेगवेगळ्या राखी आल्या आहेत. त्यामुळे आधी राखी खरेदी केली. तुलनेने राख्या महाग झाल्याचे दिसत आहे. - दीपा जैन, गृहणी''