पुणे : पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि काही ग्रामीण भागात कोरोना विषाणूचे रूग्ण प्रचंड वेगाने वाढत आहे. यामुळे कोरोना प्रभावित क्षेत्रात लॉकडाऊन अधिक कडक करा, संबंधित संपूर्ण क्षेत्राचे तातडीने सर्वेक्षण करा, वैद्यकीय तपासण्या वाढविण्याबरोबरच संस्थात्मक क्वारंटाईनवर अधिक भर देण्याचे आदेश पुणे जिल्ह्याच्या दौ-यावर आलेल्या उच्चस्तरीय केंद्रीय पथकाने जिल्हा प्रशासनाला दिले. दरम्यान जिल्ह्यातील बारामती पॅटर्न व ग्रामीण भागातील उपाययोजनांबाब या पथक समाधान देखील व्यक्त केले.पुणे शहर व जिल्हयात वाढत जाणाऱ्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय केन्द्रीय स्तरावरील पथक पुणे जिल्ह्यात 25 एप्रिल रोजी दाखल झाले आहे. या केंद्रीय पथकाने विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे भेट देवून पाहणी केली. त्यानंतर बुधवार (दि.29) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पुणे जिल्हयातील कोरोनाबाबत सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य सेवेचे अतिरिक्त सल्लागार डॉ. ए. के. गडपाले यांच्या अध्यक्षतेखाली कोविड 19 ची वाढती संख्या, साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना व त्या अनुषंगाने भविष्यात करावयाचे नियोजन याचा आढावा घेतला. यावेळी मायक्रोबायोलॉजी आणि संसर्गजन्य रोग विभागाचे संचालक डॉ. व्ही. एस. रंधावा, अनेस्थेशिया आणि गहन काळजी युनिटचे डॉ. अंशु गुप्ता, कम्युनिटी मेडिसीन एबीव्हीआयएमएस आणि आरएमएल हॉस्पिटलचे सहायक प्रा. डॉ. सागर बोरकर उपस्थित होते.डॉ. गडपाले म्हणाले, पुणे जिल्हयातील ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधासाठी सुरू असलेल्या उपाययोजना अत्यंत समाधानकारक आहेत, बारामती पॅटर्नच्या माध्यमातून चांगले काम सुरू आहे. झोपडपट्टीच्या अथवा जास्त घरांची गर्दी असलेल्या भागांवर विशेष लक्ष केंद्रित करावे. सार्वजनिक स्वच्छतागृह आहे तेथे अधिक काळजी घेण्यात यावी, अशा सूचना त्यांनी केल्या. प्रारंभी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुणे जिल्हा प्रशासनाकडून कोरोना प्रतिबंधाबाबत सुरू असलेल्या उपाययोजनेबाबतची माहिती दिली. जिल्ह्यात साथरोग प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन शहरातील सर्व रुग्णालये सक्षम केली आहेत. विविध पथके निर्माण करून त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली असून सर्वेक्षण आणि चाचण्या करण्यावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख, सचिन बारवकर आदी उपस्थित होते.
कोरोना प्रभावित क्षेत्रात लॉकडाऊन अधिक कडक करा; केंद्रीय उच्चस्तरीय पथकाचे जिल्हा प्रशासनाला आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 9:01 PM
कोरोना प्रभावित संपूर्ण क्षेत्राचे तातडीने सर्वेक्षण, वैद्यकीय तपासण्या वाढविण्याबरोबरच संस्थात्मक क्वारंटाईनवर अधिक भर देण्याचे आदेश
ठळक मुद्देकोरोनाबाधितांची वाढती संख्या, साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना, नियोजन याचा आढावा बारामती पॅटर्न व ग्रामीण भागातील उपाययोजनांबाबत उच्चस्तरीय केंद्रीय पथक समाधानी