पुणे : ‘शहरातील वाढत्या अपघातांचे प्रमाण चिंताजनक आहे. हे रोखण्यासाठी महापालिका प्रशासन, वाहतूक पोलीस, आरटीओ व स्वयसेवी संस्थांच्या मदतीने प्रयत्न केले जात आहे. तसेच परिवहन विभागाने वाहन परवाना चाचणी कडक करावी,’ असे आवाहन महापौर मुक्ता टिळक यांनी केले.जिल्हा रस्ता सुरक्षा समिती, परिवहन विभाग व पोलीस विभाग यांच्या वतीने आयोजित ‘रस्ता सुरक्षा अभियाना’च्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी, पोलीस उपायुक्त (वाहतूक) तेजस्वी सातपुते, पिंपरी चिंचवड पोलीस उपायुक्त (वाहतूक) नम्रता पाटील, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉ. बी. बी. आहुजा, एआरएआयचे वरिष्ठ उपसंचालक ए. व्ही. मन्नीवर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, विनोद सगरे, आनंद पाटील आदी उपस्थित होते.या अभियानांतर्गत सात दिवसांत पुणे शहरासह जिल्ह्यात रस्ता सुरक्षा जनजागृतीविषयी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आरती पटवर्धन यांनी सूत्रसंचालन केले.के. वेंकटेशम म्हणाले, मोटार वाहन चालक वाहतुकीच्या नियमांचे पालन करत नाहीत. त्यांनी मानसिकता बदलण्याची गरज आहे. शहर परिसरात गतवर्षीच्या तुलनेत या वर्षीच्या जानेवारी महिन्यात अपघाती मृत्यूचे प्रमाण ४४ टक्क्यांनी घटले आहे. येत्या काळात हे प्रमाण आणखी कमी करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. अपघातांमध्ये पादचाऱ्यांची संख्याही लक्षणीय असून त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जाईल.आजरी यांनी सुरक्षा अभियानाची संकल्पना स्पष्ट केली. अपघातग्रस्तांमध्ये दुचाकीचालकांचे प्रमाण लक्षणीय असल्याने हेल्मेटचा वापर करणे आवश्यक आहे. अभियानाचे ‘शून्य अपघात’ हेच ध्येय ठेवून सर्वांनी त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
वाहन परवाना चाचणी कडक करा - महापौर मुक्ता टिळक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2019 2:00 AM