पुणे : “पेशवे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राज्य करू शकले नाहीत. पेशवाई ब्राह्मणांच्या जानव्यात बंदिस्त होती. ब्राह्मणशाही स्वतःहून इंग्रजांकडे गेली. त्यांच्या पाठोपाठ आगरकर, रानडे, फुले या स्वातंत्र्य चळवळीतील महापुरुषांनी ब्रिटिश राजवटीचे समर्थन केले. त्यामुळे ब्रिटिशांनी दीडशे वर्ष राज्य केले,” असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केली.
महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक समिती आयोजित कोरेगाव भीमा विजयस्तंभ शौर्य पुरस्कार प्रदान सोहळयात ते बोलत होते. डॉ. सबनीस यांच्या हस्ते अनिता सावळे यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. महापालिकेच्या स्थायी समिती सदस्य लता राजगुरू, बाबा कांबळे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह प्रमोद आडकर आदी यावेळी उपस्थित होते.
डॉ. सबनीस म्हणाले की, आंबेडकर ब्राह्मणशाहीचा विरोध करत होते. त्यांनी दलितांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याबरोबरच ब्रिटिश राजवटीचाही विरोध केला. परंतु सगळेच ब्राह्मणेतर महापुरुष हे करू शकले नाहीत. देशात दलित, मुसलमान, जैन, ख्रिश्चन असे वेगवेगळ्या जातीधर्माचे लोक एकत्र राहतात. त्यामुळे भारत एकसंध ठेवणे. हे सर्वांचे कर्तव्य आहे. चीन आणि पाकिस्तान आपले शत्रू आहेत. आता दोन्ही ठिकाणी लढा देणे हे भाजप सरकारलाही शक्य होणार नाही. भविष्यातील भारत घडवताना देशांतर्गत सर्व आडवे-उभे संघर्ष बंद झाले पाहिजेत.
“एकोप्याचे धर्मकारण, राजकारण, समाजकारण निर्माण होणे गरजेचे आहे. महाराष्ट्र आणि देशाचा नकाशा शेतकऱ्यांच्या आंदोलनाने भयभीत झाला आहे. त्यांना अतिरेकी ठरवणारी प्रवृत्ती ही नालायक आहे. नेत्यांचा स्वार्थ खुर्चीशी आहे. ते कधीही एकोप्याची भूमिका घेत नाहीत. सध्याच्या काळात चळवळीतील सर्व महापुरुषांना एकत्र मानायला हवे,” अशी अपेक्षा डॉ. सबनीस यांनी व्यक्त केली.