राजू इनामदार
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी जणू जादूगारच ठरले आहेत. भाजपची खरी घोषणा ‘मोदी है तो मुमकीन है’ अशी आहे; पण आता त्याला जोड म्हणून फडणवीस यांच्यासाठी राज्यात ‘मुश्किल तर जाऊद्या, पण नामुमकीन असे काहीच नाही’ अशीच पुण्यातील भाजपीयांची भावना झाली आहे. त्याला कारणही तसेच आहे. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश व चिरंजीव कुणाल यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली. मात्र भाजप श्रेष्ठींच्या राजकीय गणितात ते बसले नसावे. त्यामुळे त्यांनी दोघांनाही उमेदवारी दिली नाही. त्यावरून ते नाराज होणे स्वाभाविक होते. तसे ते झालेही.
भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा उमेदवारी अर्ज दाखल होतानाच्या शक्तिप्रदर्शनात ते गैैरहजर राहिल्याने भाजपच्या गोटात धावपळ उडाली. मंत्री गिरीश महाजन तातडीने त्याचदिवशी त्यांना भेटले. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस त्याचवेळी ‘कुटुंबात उमेदवारी का नाही?’ अशी टीका करत भाजपला भंडावून सोडत होते. मात्र त्यानंतर संध्याकाळी उशिरा भाजपच्या शहर कार्यालयात रासने यांच्या प्रचाराच्या नियोजनाची जी बैठक झाली, त्याला शैलेश व कुणाल हे दोघेही उपस्थित झाले. खुद्द शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनीच त्यांना माध्यम प्रतिनिधींसमोर आणले. प्रचारात सहभागी होणार, असे या पिता-पुत्रांनीच जाहीरपणे सांगितले. पक्षाचा म्हणून काही विचार असतो, तो मान्य असल्याचेही मान्य केले.हे झाले कसे? तर त्याचदिवशी सायंकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुणाल टिळक यांना फोन केला. ते त्यांच्याबरोबर सविस्तर बोलले. त्यामुळे मग टिळक कुटुंबाची नाराजी संपली. जे कोणालाही जमले नव्हते ते फडणवीस यांनी केवळ एका फोनने साधले. म्हणून तर ‘फडणवीस है तो, कुछ भी मुमकीन है’ असे आता भाजप कार्यकर्ते म्हणू लागले आहेत.
बहुजनप्रिय बापट
कसबा मतदारसंघ विशिष्ट समाजाचा आहे, असे म्हटले जात असले तरीही, तो तसा नाही, असे आकडेवारीतून दिसतेच. त्याशिवाय मागील तब्बल ६ वेळा म्हणजे सलग ३० वर्षे या मतदारसंघावर मांड ठोकून असलेले खासदार गिरीश बापट यांच्या मतदारसंघातील जाहीर वावरावरूनही तसेच दिसते. कोणाच्या पाठीवर हात मार, कोणाच्याही शेेजारी निसंकोचपणे बस, रात्री उशिरापर्यंत कट्ट्यावर गप्पा मारत थांब. अशा बापट यांचे त्यांच्या समाजात कमी व अन्य समाजातच जास्त संबंध आहेत. पालकमंत्री झाल्यावर ते रात्री २ वाजता लाल दिव्याची गाडी घेऊन त्यांच्या प्रसिद्ध कट्ट्यावर आले होते. त्यामुळेच मतदारसंघाबाबत चुकीचे समज पसरवले जात असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.