पुणे : गेल्या काही वर्षांत टिळक रस्त्यावरूनही गणेश मिरवणूक सुरू झाल्याने मुख्य लक्ष्मी रस्त्यावरील ताण कमी झाला असला तरी गणेश मंडळांच्या वाढत्या संख्येमुळे आता टिळक रस्त्यावर ताण येऊ लागला आहे. मंगळवारी सकाळपासून ते बुधवारी दुपारी पावणेएकपर्यंत एकूण १४९ गणपती मंडळे या मार्गावरून विसर्जनासाठी गेली. त्यातील अनेक मंडळांनी तर रात्री बारा वाजल्यानंतर रस्त्याच्या बाजूला गाडी लावून तिथेच ठाण मांडले व नंतर सकाळी ६ वाजता डीजे लावून मिरवणूक पुन्हा सुरू केली.सोमवारी सकाळच्या वेळेत टिळक रस्त्याला अजिबातच गर्दी नव्हती. सायंकाळी साडेआठपर्यंत फक्त १५ मंडळे या मार्गावरून गेली. त्यातही काही मंडळांनी दुपारीच गणेश विसर्जन करून रात्रीच्या मिरणुकीतील सहभागाची व्यवस्था करून घेतली. रात्री ९ नंतर मात्र या रस्त्यावरूनही मंडळांचा ओघ वाढू लागला. मोजक्याच काही मंडळांबरोबर ढोल पथके होती. अन्यथा बहुतेक मंडळांनी डीजेलाच पसंती देऊन कार्यकर्त्यांच्या नृत्याची सोय करून घेतली. मात्र त्यामुळे संपूर्ण टिळक रस्त्यावर रात्री बारापर्यंत डीजेचा दणदणाट सुरू होता.ध्वनिक्षेपकांच्या भिंतीच उभ्या केलेली अनेक मंडळे या रस्त्यावरून येऊ लागली. एकापाठोपाठ येत असणाºया मंडळांच्या या आवाजापुढे एकही गाणे नीट ऐकायला येत नव्हते. त्यांच्याच लक्षात ही बाब आल्यामुळे नंतर दोन मंडळांमधील अंतर वाढवत नेण्यात आले. त्यामुळे मिरवणुकीस विलंब झाला. टिळक रस्त्यावर शारदा सहकारी बँक तसेच महापालिका यांचे दोन मंडप मंडळाच्या पदाधिकाºयांच्या स्वागतासाठी उभारण्यात आले होते. मंडळ आले, की लगेचच त्यांच्या नावाचा उल्लेख करीत अध्यक्षांना सन्मानाने मंडपात बोलावण्यात येत होते.सहायक पोलीस निरीक्षक अलका सरग, महापालिकेचे चंद्रकांत वाघमारे, तसेच अन्य काही अधिकारी, पदाधिकारी मंडपात बसून होते.या रस्त्यावरची हत्ती गणपती, लाकडी गणपती, आझाद मित्र मंडळ, गोकुळ वस्ताद तालीम, वनराज, मार्केट यार्ड, नवरंग युवक मंडळ, नाना पेठ अशी बहुसंख्य मंडळे पुण्याच्या पूर्व भागातील आहेत. उत्सव उत्साहात साजरा करणे म्हणजे डीजे लावून नृत्य करणे हीच त्यांची कल्पना मंडळाच्या मिरवणुकीतही प्रतिबिंबित झाली होती.सर्वच मंडळांच्यासमोर मोठ्या संख्येने नृत्ये सुरू होती. त्यावर रंगीबेरंगी प्रकाशझोत टाकले जात होते. गाणीही सगळी उडत्या चालीची व भल्या मोठ्या आवाजात लावली होती. उत्साहाने नाचगाणे केले जात होते.
डीजेमुळे दणाणला टिळक रस्ता; बाराला बंद, पहाटे सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 12:19 AM