पुणे : ‘संगणक अभियंता नयना पुजारीचा मृतदेह सापडल्यानंतर तपासात हा गुन्हा योगेश राऊतने केल्याचा संशय बळावला. त्यामुळे त्याला ताब्यात घेतले तेव्हा त्याने गुन्ह्याची कबुली आणि माहिती दिली, असे या खटल्यातील तपास अधिकारी पोलीस निरीक्षक शौकत अली साबीर अली सय्यद यांनी न्यायालयात दिली. पुजारी हिचा ८ आॅक्टोबर २००९ रोजी राजगुरुनगर येथील जरेवाडी फाटा येथे मृतदेह सापडला होता. तिच्यावर बलात्कार करून तिचा खून केल्याचे निष्पन्न झाले होते. याप्रकरणी योगेश राऊत, महेश ठाकूर, विश्वास कदम आणि राजेश चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. राजेश चौधरी माफीचा साक्षीदार झाला आहे. तत्कालीन गुन्हे शाखा चारचे पोलीस निरीक्षक शौकत अली साबीर अली सय्यद हे यात तपासी अधिकारी आहेत. त्यांची साक्ष विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी नोंदविली. सय्यद यांनी साक्षीत म्हटले, की नयना पुजारी ७ आॅक्टोबर २००९ रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या पतीने ८ आॅक्टोबरला येरवडा पोलीस ठाण्यात दिली होती. त्यादिवशी सायंकाळी जरेवाडी फाटा येथे एका महिलेचा मृतदेह सापडला. हा मृतदेह नयना हिचा असल्याचे निष्पन्न झाले. तिच्या एटीएम कार्डातून ७, ८ आणि ९ आॅक्टोबरला ६१ हजार रुपये काढल्याचे आढळून आले. तिचे दागिनेही चोरीला गेले होते. सिनेक्रॉन व झेन्सॉर कंपनीचे कार्यालय एकाच इमारतीत आहे. तेथील सिक्युरिटी गार्ड, कॅबचालक आणि तेथील लोकांची चौकशी करण्यात आली. एटीएममधून पैसे काढण्याचे कच्चे स्केच बनविण्यात आले. मोबाईलचा डाटा तपासण्यात आला. हा नंबर योगेश राऊत वापरत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्याच्याविषयी माहिती घेतली. त्याने त्याची गाडी झेन्सॉर कंपनीला लावल्याचे माहीत झाले आणि ती तो स्वत:च चालवित होता. त्याने ही गाडी १२ आॅक्टोबर रोजी भावाला चालविण्यास दिली होती. त्यामुळे त्याच्याविषयी संशय बळावला. १६ आॅक्टोबर रोजी त्याला येरवडा परिसरात पकडले. त्याने गुन्ह्याची कबुली देऊन गुन्ह्याची माहिती दिली.योगेश राऊत, महेश ठाकूर, विश्वास कदम हे ७ तारखेला खराडी बायपास येथे गाडीतून गेले. त्यांना तेथे नयना पुजारी या घरी जाण्यासाठी गाडी शोधत असल्याचे दिसले. त्यांनी नयना पुजारी यांना पॅसेंजर म्हणून गाडीत बसवून घरी सोडतो, असे सांगितले. त्यानंतर तिला मगरपट्टा, वाघोली, मांजरी अशा ठिकाणी फिरवले. निर्जनस्थळी गाडी नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. राजेश चौधरीला बोलावून घेतले. त्यानंतर त्यांनी पुन्हा तिच्यावर बलात्कार केला. एटीएममधून पैसे काढले. जेवण झाल्यानंतर नयना यांचे आयकार्ड पाहिले. त्या सिनेक्रॉन कंपनीत कामाला असल्याचे समजले. ती आपल्याला ओळखेल, या भीतीने तिचा जरेवाडी फाटा येथे ओढणीने गळा आवळून खड्ड्यात ढकलून दिले. तिच्या डोक्यात दगड घातला, असे योगेश राऊतने माहिती दिली होती, असे सय्यद यांनी साक्षीत सांगितले.
...त्या वेळी आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली होती
By admin | Published: December 18, 2015 2:29 AM