बारामती : नदीच्या कडेला गाव असून, पाणी नाही. घर बांधण्यासाठी ठेवलेले पैसे शेतीच्या पाण्यासाठी खर्च केले. बोअर घेतले, परंंतु तेही कोरडे गेले. ५५ हजारांची माती झाली. शेती तर जगलीच नाही. आता घर बांधण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे लेकराबाळांसह उघड्यावर राहण्याची वेळ आली, अशी हृदयद्रावक व्यथा निरवांगी (ता. इंदापूर) येथील वृद्धा कलावती गायकवाड यांनी मांडली. निरवांगी तसे पाहिले, तर नीरा नदीच्या कडेचे बागायती गाव. परंतु पाण्याचे योग्य नियोजन नसल्याने गावाला उन्हाळ्यात कायमच पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. नदीपात्रातील बेसुमार वाळूउपशामुळे भूगर्भातील पाण्याची पातळीही खोलवर गेली आहे. त्यामुळे पाण्याच्या शोधार्थ येथील शेतकरी खिसा रिकामा करीत आहेत. कलावती नामदेव गायकवाड आणि उत्तमराव गायकवाड ही माय-लेकराची जोडी शेती, जनावरे जगवण्यासाठी संघर्ष करीत आहेत. नीरा नदीपासून काही अंतरावरच उत्तमराव गायकवाड यांची तीन एकर जमीन आहे; मात्र तिही आता उजाड झाली आहे. शेतात नावालाही पीक नाही. त्यांच्या दावणीला सहा ते सात जनावरे आहेत. गावातही आजूबाजूला अशीच परिस्थिती असल्याने जनावरांना चारा, पाणी मिळणे मुश्कील झाले आहे. जनावरे जगवण्यासाठी चाऱ्याची सोय करणे गरजेचे होते. दुष्काळामुळे चाऱ्याचे दरही गगणाला भिडले आहेत. मात्र खिशात दमडी नसल्याने चारा आणायचा कसा? असा त्यांच्यापुढे प्रश्न होता. उत्तमराव गायकवाड यांचे शेतातच झोपडे होते. उत्तमराव यांना तीन मुली व एक मुलगा, अशी अपत्ये आहेत. मुली मोठ्या होऊ लागल्याने त्यांनी पक्के घर बांधण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी काडी-काडी जमवून ५५ हजार उभे केले. झोपडी मोडून त्याजागी घराचे काम सुरू केले. मात्र, दुष्काळाने उत्तमरावांना पुरते हतबल केले. दावणीची जनावरे अन्न-पाण्यावाचून तडफडू लागली. यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न उत्तमरावांनी केला. आई कलावती यांच्या सल्ल्याने बोअर घेण्याचा निर्णय घेतला. नदी अगदी जवळ असल्याने बोअरला चांगले पाणी लागेल, असा त्यांचा अंदाज होता, त्यामुळे घराच्या बांधकामासाठी ठेवलेले ५५ हजार रुपये त्यांनी बोअरसाठी खर्च केले. मात्र, उत्तमरावांचा हा अंदाज पुरता खोटा ठरला. बोअर कोरडे गेले. दिवस-रात्र प्रतीक्षा केल्यानंतर केवळ अर्धा ते पाऊनतास बोअर चालते. मात्र, बोअरचे पाणीही क्षारयुक्त असल्याने जनावरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. त्याच पाण्यावर जनावरांची व घरच्या माणसांची तहान भागवली जात आहे. या अत्यल्प पाण्यावर त्यांनी जनावरांसाठी काही प्रमाणात चाराही लावला आहे. मात्र, या क्षारयुक्त पाण्यामुळे जमिनीही क्षारपड झाल्या आहेत.
पाणीटंचाईने आणली उघड्यावर राहण्याची वेळ
By admin | Published: April 19, 2016 1:05 AM