राजगुरुनगर : निसर्गाने दिले आणि नोटबंदीने घालविले, अशी शेतकऱ्यांची आणि व्यावसायिकांची परिस्थिती नोटाबंदीमुळे झाली आहे. अनेक बँका अजूनही सरकारी मर्यादेइतकी रक्कम ग्राहकाला त्याच्या खात्यातून काढू देण्याइतपत सक्षम झाल्या नसून २-४ हजार रुपयांच्या पुढे जात नाहीत, असे चित्र आहे. दोन-तीन वर्षांच्या दुष्काळानंतर यावर्षी चांगला पाऊस झाला. त्यामुळे शेतकरीवर्गात आणि बाजारपेठेतही उत्साहाचे वातावरण होते. शेतकऱ्याला चांगले उत्पन्न मिळेल, अशी आशा होती. विशेषत: जलाशयांमध्ये पाणी असल्याने रब्बी आणि नगदी पिके सापडून पैसा हातात येईल, अशी आशा होती. शेतकऱ्याकडे पैसा आला की, दोन वर्षे मरगळलेल्या बाजारपेठेत तेजी येईल, असे व्यावसायिकांना वाटत होते. दिवाळीत त्याची थोडीशी चुणूकही दिसली आणि त्यानंतर लगेचच नोटाबंदी झाली.लोकांना बँकेत पैसे असूनही काढता येत नसल्याचा परिणाम होऊन शेतीच्या बहुतेक मालाचे भाव पडले. विशेषत: नगदी पीक असलेला कांदा, भाजीपाला गडगडला. पिके चांगली असून, भाव पडल्याने शेतकऱ्यांना कृत्रिम दुष्काळाला सामोरे जाण्याची वेळ आली. अजूनही परिस्थितीत सुधारणा नसून शेतकरी हताश झाला आहे. पैसे हातात येण्याचे तर दूरच खाण्यापिण्याचे हाल व्हायची वेळ आली. तसेच, आधीच असलेल्या कर्जात वाढ झाली. मोसमी पाऊस चांगला झाल्याने व्यापारावरचे मळभ दूर होईल असे व्यापारी आणि व्यावसायिकांना वाटत होते. पण, उलटे झाले. दुष्काळामुळे आधीची दोन वर्षे असलेली मंदी बरी म्हणायची वेळ नोटाबंदीने आणली. बाजारपेठा ओस पडल्या. मालाला उठाव होईना. गेल्यावर्षी सिंहस्थ पर्वामुळे विवाहमुहूर्त कमी होते. यावर्षी भरपूर विवाहमुहूर्त असल्याने तेजीची आशा होती, ती मावळली. (वार्ताहर)नवीन वर्षात पहिल्या आठवड्यात पुन्हा गर्दीराष्ट्रीयीकृत बँकांमधून आता आठवड्याला २४००० रक्कम मिळू लागली आहे. पण, इतर बँका अजूनही तेवढी रक्कम देऊ शकत नाही. बँकांमधील गर्दी नोव्हेंबरच्या तुलनेत कमी झाली आहे. मात्र, जानेवारीची लोक वाट पाहत आहेत. त्यामुळे पहिल्या आठवड्यात पुन्हा गर्दी उसळण्याची बँक कर्मचाऱ्यांना भीती आहे. बँक कर्मचाऱ्यांवर या दिवसांमध्ये प्रचंड ताण पडला. रात्री आठच्या आधी त्यांचे काम कधीही उरकले नाही. अनेकदा रात्री १२ वाजले. अजूनही परिस्थिती सुधारली नसून कॅशलेस व्यवहारांसाठी स्वॅप मशीन घेऊन थोडाबहुत व्यापार वाढवायचा प्रयत्न ते करीत आहेत. स्वॅप मशीनचाही तुटवडा असून मागणी असूनही मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. अजूनही एटीएममध्ये पैसे असल्याचे कळले की, लोक तिथे धाव घेतात आणि रांग लावतात, काही एटीएमवर रात्री उशिरापर्यंत रांग असते.
कृत्रिम दुष्काळाला तोंड देण्याची वेळ
By admin | Published: December 30, 2016 4:30 AM